धोकादायक; पुण्यातही दाखल झाला कोरोना व्हायरस


पुणे – चीनसह जगभरात कोरोना व्हायरसची दहशत पसरत असतानाच कोरोनाचे रुग्ण भारतातही आढळले आहेत. पंजाब आणि कर्नाटक नंतर आता महाराष्ट्रातही कोरोना विषाणूची लागण झालेले दोन रुग्ण आढळले आहेत. दुबईहून हे दोन्ही रुग्ण भारतात परतले होते. पुण्यातील नायडू रुग्णालयात या दोघांनाही दाखल करण्यात आले आहे.

एक तारखेला पुण्यातील हे पती – पत्नी दुबईवरुन परतले होते. एका ट्रॅव्हल एजन्सी मार्फत हे दोघे दुबईला पर्यटनासाठी गेले होते. पण 1 तारखेला ते जेव्हा पुण्यात आले तेव्हा त्यांच्यामध्ये कोरोनाची कोणतीही लक्षणे नव्हती. त्यामुळे ते त्यांच्या घरी गेले. पण, त्यांना आज त्रास होऊ लागल्याने तपासणीसाठी महापालिकेच्या नायडू हॉस्पिटलमध्ये हे पती पत्नी पोहचले.

त्यानंतर त्यांचे नमुणे तपासणीसाठी एन.आय.व्ही कडे पाठवण्यात आले असता ते पॉझिटीव्ह आढळले. हे दोघे पती पत्नी दुबई वरुन आले तेव्हा त्यांच्यामध्ये कोरोनाची कोणतीही लक्षणे नव्हती. दुबईमध्येही कोरोनाची लागण झाल्याचे तोपर्यंत दिसून न आल्यामुळे या दोघांबरोरच ते ज्या 40 जणांबरोबर दुबईला गेले होते, त्यापैकी कोणाचीही तपासणी करण्यात आलेली नाही, असे स्पष्टीकरण पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून देण्यात आले आहे.

पण, हे पती पत्नी आता कोरोना पॉझिटीव्ह आढळल्याने ज्या 40 जणांसोबत ते गेले होते त्यांचीही तपासणी करावी लागणार आहे. त्याचसोबत ते मागील 8 दिवसांमध्ये ज्यांच्या संपर्कात आले असतील, त्यांचाही शोध घ्यावा लागणार असल्याचे आरोग्य विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

Leave a Comment