बंगळुरु – कोरोनाग्रस्तांच्या देशातील संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असून केरळमध्ये आज (मंगळवारी) कोरोनाचे नव्याने सहा रुग्ण सापडले आहेत. तर कर्नाटकामध्ये ४ रुग्ण आढळले आहेत. आतापर्यंत १२ जणांना केरळ राज्यामध्ये कोरोनाची लागण झाली आहे. तर संपूर्ण देशभरामध्ये ५५ पेक्षा जास्त जणांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे.
केरळात ६ तर कर्नाटकात ४ नवे कोरोनाग्रस्त
आणखी सहा रुग्ण केरळमध्ये सापडले असून रुग्णांची एकूण संख्या १२ झाल्याची माहिती केरळचे मुख्यमंत्री पी. विजयन यांनी दिली. तर कर्नाटकात ४ रुग्ण सापडले आहेत. त्यांच्या कुटुंबियांना वेगळ्या विभागामध्ये ठेवण्यात आले आहे. तसेच त्यांच्यावर देखरेख ठेवण्यात येत आहे. नागरिकांनी आरोग्याची काळजी घ्यावी, अशी माहिती राज्याचे आरोग्य मंत्री बी. श्रीरामल्लू यांनी दिली.
केरळमध्ये कोरोनाच्या धोक्यामुळे सातवीपर्यंतच्या शाळा मार्च महिन्याच्या शेवटपर्यंत बंद ठेवण्यात आल्या आहेत. राज्यामध्ये मॉल, थिएटरवरही निर्बंध लागू करण्यात आले आहेत. प्रशासनाकडून नागरिकांमध्ये खबरदारीच्या उपायांबाबत जनजागृती करण्यात आली आहे.