भारतातील कोरोनाग्रस्तांचा आकडा चाळीशीच्या पार


नवी दिल्ली – चीननंतर जगभरातील अन्य देशांमध्ये थैमान घातलेल्या कोरोना व्हायरसने भारतातही आपले हात-पाय पसरण्यास सुरुवात केली आहे. भारतातील कोरोनाग्रस्तांच्या आकड्यात दिवसेंदिवस वाढ होत असून देशातील कोरोना ग्रस्तांची संख्या चाळीशीच्या पार पोहचली आहे.

कोरोना व्हायरसचा अजून एक रुग्ण केरळमध्ये आढळला असून कोची येथील एका 3 वर्षीय मुलगी कोरोना व्हायरस बाधित झाली आहे. आपल्या कुटुंबासोबत कोरोनाग्रस्त मुलगी 7 मार्चला ईटलीवरून भारतामध्ये परतली आहे. विमानतळावर तपासणी केल्यानंतर कुटुंबासह तिला निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहे. केरळमध्ये काही दिवसांपूर्वी ५ जणांना कोरोना झाल्याचे तपासणीत निष्पन्न झाले आहे.

आत्तापर्यंत 40 कोरोनाचे रुग्ण भारतामध्ये आढळून आले आहेत. तर अनेकांना देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे. विविध राज्यांनी संभाव्य धोका ओळखून आरोग्य यंत्रणा सज्ज ठेवली आहे. तसेच कोरोना व्हायरसबाबत नागरिकांमध्ये जनजागृती वाढवण्यास सुरुवात केली आहे. सार्वजनिक कार्यक्रम टाळण्याबरोबरच आरोग्याची काळजी घेण्याबाबत नियमावली जारी केली आहे. तसेच पराराष्ट्र यात्रा आणि व्हायरसचे संक्रमण झाल्याची माहिती लपल्यास कारवाई करण्याचे आदेश केरळ प्रशासनाने दिले आहेत. भारतात कोरोना व्हायरस संदर्भात विशेष काळजी घेण्यासाठी आवाहन केले जात आहे. सर्व नागरिकांनी कोरोना व्हायरसचा संसर्ग टाळण्यासाठी कोणाशीही हस्तांदोलन करू नये.

Leave a Comment