
भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी इंग्लंडमध्ये पार पडलेल्या विश्वचषकानंतर एकही आंतरराष्ट्रीय सामना खेळलेला नाही. तो आता भारतीय संघात पुन्हा दिसणार की नाही, याबाबत देखील चर्चा सुरु झाली आहे. पण जर धोनीला भारतीय संघात पुनरागमन करायचे असेल तर बीसीसीआयने त्याच्यासमोर फक्त एकच अट ठेवली आहे.
नाही तर धोनीसाठी कायमचे बंद होतील भारतीय संघाचे दरवाजे
आयसीसीच्या तीन स्पर्धा धोनीने भारताला जिंकवून दिल्या. भारताने धोनीच्या नेतृत्वाखाली टी-20 विश्वचषक जिंकल्यानंतर चॅम्पियन्स ट्रॉफीही पटकावली आणि २०११ साली एकदिवसीय विश्वचषकाला गवसणी घातल्यामुळे भारतीय संघासाठी धोनीचा अनुभव नेहमीच मोलाचा ठरतो. बीसीसीआयने धोनीपुढे सध्याच्या घडीला संघात पुनरागमन करण्यासाठी एक अट ठेवली आहे. धोनी सध्या या अटीनुसार आपली तयारी करत असल्याचे म्हटले जात आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, धोनी, बीसीसीआय, निवड समिती, कर्णधार आणि प्रशिक्षक यांच्यामध्ये एक गोष्ट ठरली असून धोनीला जर भारतीय संघात पुनरागमन करायचे असेल तर आयपीएलमध्ये त्याने चमकदार कामगिरी करायला हवी. धोनीला आयपीएलमध्ये जर चांगली कामगिरी करता आली नाही तर त्याच्यासाठी भारतीय संघाचे दरवाजे जवळपास बंद होऊ शकतील.
