बार्बी डॉलच्या नाव ऐकल्यावर लहानपणीच्या आठवणी डोळ्यासमोर येतात. प्रत्येकजण लहानपणी या बाहुलीशी खेळले असेल. मात्र आता ही लहान बाहुली वृद्ध होत चालली आहे. ही बार्बी डॉल आता 61 वर्षांची झाली आहे. 9 मार्च 1959 ला सर्वात प्रथम बार्बीला बाजारात लाँच करण्यात आले होते. तेव्हापासून ते आतापर्यंत 6 दशकात लहान मुलांमध्ये या बार्बी डॉलची आवड कायम आहे.
61 वर्षांची झाली लाडकी ‘बार्बी गर्ल’
लहान मुलांची या डॉलप्रती असलेल्या आवडीमुळे कंपनीने या बाहुलीची अनेक रुपे बाजारात आणली व चिमुकल्यांना ती आवडली देखील.
बार्बीला तयार करणे व लहान मुलांसाठी आणण्याचा सर्वात प्रथम विचार अमेरिकेतील उद्योजक रुथ हँडलर यांना आला होता. त्यांना याची कल्पना त्यांची मुलगी व तिच्या मैत्रिणींपासून सूचली होती. जेव्हा त्यांनी आपल्या मुलीला कार्डबोर्डपासून बनलेल्या बाहुलीबरोबर खेळताना पाहिले, त्यावेळी त्यांनी बार्बी बनविण्याचे ठरवले. यानंतर 9 मार्च 1959 ला सर्वात प्रथम बार्बी डॉलचे बाजारात आगमन झाले.
लाँच झाल्यानंतर पहिल्याच वर्षी 3 लाखांपेक्षा अधिक बार्बी डॉलची विक्री झाली होती. आज 6 दशकांनंतर देखील लहान मुलांमध्ये बार्बीबद्दलची आवड तशीच आहे. या काळात कंपनीने विविध रुपात बार्बीला लाँच केले. बार्बीची लोकप्रियता आजही एवढी आहे की ट्विटर आणि इंस्टाग्रामवर तिचे 20 लाखांपेक्षा अधिक फॉलोअर्स आहेत.
2016 मध्ये कंपनीने बार्बी डॉलचे तीन नवीन बॉडी टाइप सादर केले. यात उंच बार्बी, लहान उंचीची आणि थोडी लठ्ठ बार्बीचा समावेश होता. बार्बीच्या इतिहासात पहिल्यांदाच बार्बी डॉलच्या स्थापित मॉडेलमध्ये बदल करण्यात आले होते.