दहा विद्यमान नगरसेवकांना डच्चू देणार असदुद्दीन ओवेसी


औरंगाबाद – ‘एमआयएम’ पूर्ण ताकदीनिशी औरंगाबाद महापालिका निवडणुकीत उतरताना दिसत असून पक्ष श्रेष्ठींकडून औरंगाबादमधील ‘एमआयएम’च्या दहा विद्यमान नगरसेवकांना डच्चू देऊन निवडणुकीत पक्षाचा नव्या चेहऱ्यांना संधी देण्यावर भर असणार आहे.

‘एमआयएम’ने आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गुप्त सर्वेक्षण करुन नगरसेवकांच्या कार्याची माहिती घेतली असून ‘एमआयएम’चे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांना या सर्व्हेचा अहवाल सादर करण्यात आला. त्यांच्या सूचनेनुसार दहा नगरसेवकांचे तिकीट कापले जाण्याची शक्यता आहे.

विद्यमान नगरसेवकांचा पत्ता पक्षविरोधी काम, असमाधानकारक कामगिरी आणि मतदारांमधील नाराजी यामुळे दहा कट होण्याचे संकेत आहेत. एमआयएमचे औरंगबाद महानगरपालिकेत सध्या 25 नगरसेवक असून त्यातील 15 विद्यमान नगरसेवकांना पुन्हा संधी मिळेल. एमआयएम सर्व 112 जागा लढवणार असल्यास जवळपास 100 नवे उमेदवार ‘एमआयएम’च्या तिकीटावर निवडणूक लढवताना दिसतील. निवडणूक आयोगाकडून अद्याप औरंगाबाद महापालिका निवडणुकांचे मतदान, मतमोजणी याविषयी घोषणा झालेली नाही. परंतु त्याआधीच जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापायला सुरुवात झाली आहे.

Leave a Comment