या रहस्यमयी ४७ मजली हॉटेलला ५ वा मजला नाही


उत्तर कोरिया हा जगासाठी नेहमीच रहस्यमयी देश राहिला आहे. येथील विचित्र कायदे कानून, हुकुमशाही, हुकुमशहा किम जोंग उन आणि त्यांच्या मिसाईल चाचण्या यामुळे हा देश नेहमी चर्चेत असतो पण या देशाची अंदर की बात नेहमीच रहस्य राहिली आहे. या देशाची राजधानी प्योंगपोंग मध्ये देशातील सर्वात मोठे ४७ मजली हॉटेल आहे. यांगाकडो असे या हॉटेलचे नाव असून ते ताएन्डोंग नदीतील एका बेटावर बांधले गेले आहे. हे हॉटेल जगासाठी आणि देशातील नागरिकांसाठी नेहमीच एक कोडे राहिले आहे.

या हॉटेलमध्ये १ हजार रुम्स आहेत. चार रेस्टोरंट, १ बाउलिंग अॅले व मसाज पार्लरही आहे. ४७ मजली या हॉटेलला पाचवा मजला नाही. म्हणजे हॉटेल मध्ये ज्या लिफ्ट आहेत त्यात पाचव्या मजल्याचे बटन नाही. अर्थात जिन्याने या मजल्यावर जाण्याची हिम्मत कुणीच करू शकत नाही. त्यामुळे हा ५ वा असलेला अथवा नसलेला मजला नेहमीच रहस्य राहिला आहे.

१९८६ मध्ये या हॉटेलचे बांधकाम सुरु झाले आणि १९९२ मध्ये ते पूर्ण झाले. फ्रांसच्या कॅपेनन बर्नार्ड कन्स्ट्रक्शन कंपनीने हे बांधकाम केले. हे हॉटेल १९९६ मध्ये सर्वप्रथम सर्वांसाठी खुले झाले पण पाचव्या मजल्यावर कुणालाच जाता येत नाही. या संदर्भातील नियम अतिशय कडक आहेत. कुणी परदेशी माणूस येथे गेलाच तर त्याला तुरुंगात जन्म काढावा लागतो. एका अमेरिकन माणसाच्या म्हणण्यानुसार या पाचव्या मजल्यावर बंकर प्रमाणे छोट्या खोल्या असून त्याला कुलुपे आहेत. भिंतीवर अमेरिका आणि जपान विरोधी पेंटींग्स आणि किम जोंग उन व त्याचे वडील किम जोंग इल यांचे फोटो आहेत.

या भिंतींवर अमेरिकेवर आम्ही हजार वेळा सूड उगविणार असे लिहिले गेल्याचेही सांगितले जाते. सरकारच्या म्हणण्यानुसार या हॉटेलला पाचवा मजलाच नाही आणि सरकारचा हा दावा कुणीच खोडून काढू शकत नाही.

Leave a Comment