इंडिगो फ्लाईट मधून चोरीला गेली भज्जीची बॅट


फोफो सौजन्य शोर्टपीडीया
टीम इंडियाचा सिनिअर स्पिनर हरभजनसिंग उर्फ भज्जी याची बॅट विमानातून चोरीला गेली असून झाल्या प्रकाराबद्दल भज्जीने विमान कंपनीकडे नाराजी नोंदविली आहे. आपल्या ट्विटर अकौंटवरून भज्जीने बॅट चोराविरुद्ध कारवाई करा अशी मागणी केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार हरभजनसिंग इंडिगोच्या एअरबस ६ ई- ६३११३ या फ्लाईट मधून मुंबई कोईमतूर प्रवास करत होता तेव्हा त्याच्या किट मधून ही बॅट नाहीशी झाली. या संदर्भात भज्जीने इंडिगो आणि एअरपोर्ट सुरक्षेची जबाबदारी सांभाळणाऱ्या केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बलाला टॅग करून बॅट चोरीसंदर्भात लिहिले आहे आणि गुन्हेगार शोधा असे सुनावले आहे.

भज्जी लिहितो, कुणाच्याही सामानातून एखादी वस्तू काढणे ही चोरीच आहे. माझी बॅट चोरी झाली आहे ती शोधण्यास मला मदत करा. इंडिगोने भज्जीच्या ट्विटला त्वरित उत्तर दिले असून बॅट चोरी झाल्याचे ऐकून वाईट वाटल्याचे व त्यासंदर्भात तपास सुरु केल्याचे कळविले आहे. पण अजूनही बॅट न मिळाल्याने भज्जीने पुन्हा विमान कंपनीला ही चोरी गांभीर्याने घ्या असे विनविले आहे.

Leave a Comment