दोन्ही अणुबॉम्ब हल्ल्यातून वाचलेली एकमेव व्यक्ती


फोटो सौजन्य कॅच न्यूज
दुसऱ्या जागतिक महायुद्धात अमेरिकेने जपानच्या हिरोशिमा आणि नागासाकी या दोन शहरांवर अणुबॉम्ब टाकून ही दोन्ही शहरे बेचिराख केली होती. मात्र या दोन्ही अणुबॉम्ब हल्ल्यातून बचावलेली एकमेव व्यक्ती होती सुतोमू यामागुची. २०१० साली यामागुची पोटाच्या कॅन्सरने मरण पावले त्यावेळी ते ९३ वर्षांचे होते. म्हणजे दोन्ही अणुबॉम्ब हल्ल्याच्या स्मृती त्यांच्याजवळ होत्या. जपानच्या अधिकृत कागदपत्रातून ही माहिती उघड झाली आहे.

हिरोशिमावर टाकल्या गेलेल्या अणुबॉम्ब मुळे ४० हजारावर माणसे मृत्युमुखी पडली होती तर नागासाकी वरील हल्ल्यात ही संख्या ७० हजारावर होती. ज्या दिवशी हिरोशिमावर अणुबॉम्ब टाकला गेला तेव्हा यामागुची काही कामानिमित्त हिरोशिमाला गेले होते. बॉम्बहल्ल्यात ते एक रात्र तेथेच अडकले आणि वाईट प्रकारे त्यांचे शरीर भाजले होते. मात्र जखमी अवस्थेत ते आपल्या गावी नागासाकीला परतले आणि ९ ऑगस्टला नागासाकीवर दुसरा अणुबॉम्ब पडला. मात्र या हल्ल्यातूनही यामागुची बचावले होते.

अणुबॉम्ब हल्ल्यामुळे मृत आणि जखमींची जी नावे नोंदविली गेली त्यात यामागुची यांचेही नाव होते मात्र पूर्ण नाव नव्हते. दुसऱ्या हल्ल्यात त्यांचे पूर्ण नाव नोंदविले गेले आणि दोन्ही हल्ल्यातून बचावलेले ते जगातील एकमेव व्यक्ती ठरले. ते म्हणत असत की माझ्या मृत्युनंतर येणारया पिढ्या अणुबॉम्ब हल्ल्याचा अंगावर शहारे आणणारा काळा इतिहास सरकारी कागदपत्रातून जाणू शकतील. विशेष म्हणजे अणुहल्ल्यातून बचावलेल्या लोकांना जपान सरकार दर महिना नुकसान भरपाई म्हणून काही रक्कम देते. या लोकांना स्थानिक भाषेत हिबाकुशा म्हटले जाते. अणुबॉम्ब हल्ल्यातून झालेल्या रेडीएशन मुळे नंतर अनेक आजार पसरले आणि अनेक लोकांचे कॅन्सरने मरण ओढविले होते.

Leave a Comment