ईडीला सहकार्य न केल्याप्रकरणी येस बँकेचे संस्थापक राणा कपूर यांना अटक


मुंबई – आज (रविवारी) पहाटे 3 वाजता आर्थिक डबघाईला आलेल्या येस बँकेचे माजी संस्थापक राणा कपूर यांना ईडीकडून अटक करण्यात आली आहे. राणा कपूर यांच्या मुंबईतील वरळीमधील घरावर मनी लाँडरिंग संदर्भात ईडीने शुक्रवारी रात्री उशिरा धाड मारली होती. राणा कपूर यांच्या घरातून यामध्ये काही महत्वाची कागदपत्रे ईडीच्या हाती लागल्यानंतर शनिवारी दुपारी 12 च्या दरम्यान ईडीच्या अधिकाऱ्यांनी राणा कपूर यांना चौकशीसाठी ईडी कार्यालयात आणले होते. राणा कपूर ईडी चौकशीत सहकार्य करत नसल्यामुळे ईडीच्या अधिकाऱ्यांनी आज पहाटे राणा कपूर यांना अटक केली आहे.

ईडीला तब्बल 20 तास चाललेल्या या चौकशीत महत्वाची माहिती मिळाली आहे. कॉर्पोरेट क्षेत्रातील मोठ्या कंपनीना राणा कपूर यांच्या बँकेकडून हजारो कोटी रुपये कर्ज देण्यात आल्यानंतर राणा कपूर यांच्या कुटुंबातील काही सदस्यांच्या बँक खात्यात अचानक मोठ्या रकमा जमा करण्यात आल्या होत्या. यात राणा कपूर यांच्या पत्नीच्या बँक अकाऊंट खात्यातही पैसे जमा झाले होते. ईडीच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, राणा कपूर यांच्या कुटुंबातील काही सदस्यांच्या बँक खात्यात 600 कोटींहून अधिक रक्कम जमा झाली होती. डीएचएफएल सारख्या कर्ज बुडवणाऱ्या कंपनीकडून ही रक्कम देण्यात आली होती. दरम्यान, राणा कपूर यांच्या अटकेनंतर त्यांना न्यायालयात हजर केले जाणार आहे.

Leave a Comment