अमोल कोल्हेंच्या जनता दरबारात कामगारांनी वाचला तक्रारींचा पाढा


पुणे – राजगुरुनगर येथे पहिल्यांदाच शिरूर लोकसभेचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांचा जनता दरबार भरला. सर्व सामान्य लोकांचे प्रश्न सुटतील या आशेने अनेकांनी या जनता दरबारात हजेरी लावली आणि आपल्या तक्रारींचा पाढा वाचला. पण या जनता दरबारात कामगारांसह शेतकऱ्यांनी असंख्य प्रश्न मांडले, मात्र अनेकांच्या पदरी निराशाच पडली. राजगुरुगनगरला शनिवारी दिवसभर सुरू असलेला शिरूरचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांचा पहिला वहिला जनता दरबार रात्री उशिरा पर्यंत सुरूच होता. पण उपस्थितांच्या प्रश्नांना उत्तरे देता देता डॉ कोल्हे यांची चांगलीच दमछाक झाली.

शेतकऱ्यांच्या चाकण एमआयडीसी व खेड सेझ परिसरातील जमिनी घेतल्या, पण कामगारांच्या हाती काम मिळाले नाही शेतीला पाणी नाही हाताला काम नसल्याचे म्हणत कामगारांनी खासदार कोल्हे यांच्या जनता दरबारात प्रश्न मांडला. पण अनेक प्रश्नांना समाधानकारक उत्तरे कोल्हे यांना देता आली नाहीत.

एकीकडे कामगार आपल्या हक्काची लढाई लढत आहे तर दुसरीकडे राजकीय मंडळी कामगारांचे प्रश्न सोडवण्याऐवजी कागदी आदेशाची वाट पाहतात. साहेब तुमच्या एका फोनमुळे आम्हाला आमची नोकरी मिळेल, तुम्हाला मते देऊन आमचा काही उपयोग झाला नसल्याचे म्हणत खासदार अमोल कोल्हेंसमोरच त्रासलेल्या कामगारांनी आपली व्यथा मांडली.

मोठ्या संख्येने अधिकारीवर्ग जनता दरबारात कामगार शेतकरी व्यावसायिक असे सर्वजण वेगवेगळ्या समस्या घेऊन उपस्थित होते. प्रश्नांचा मोठा डोंगर जनता दरबारात उभा राहिला. पण आपल्या प्रश्नांची अनेकांना उत्तरच मिळाली नाहीत. त्यामुळे अनेकांची जनता दरबारात निराशा झाल्याचे चित्र पाहायला मिळालं.

Leave a Comment