जेव्हा जेव्हा देशावर संकट आले, त्यावेळी पुरूषांबरोबर महिलांनी देखील खांद्याला खांदा लावून शत्रूचा पराभव केला आहे. आज महिला देखील सैन्यात हिरहिरीने सहभागी होत आहे. आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने देशाचे नाव उंचावणाऱ्या महिला सैनिकांविषयी जाणून घेऊया.
जाणून घ्या सैन्यात भरती होऊन देशाचे नाव उंचावणाऱ्या महिलांविषयी
किरण शेखावत –
राजस्थानची कन्या आणि हरियाणाची सून असणाऱ्या लेफ्टिनेंट किरण शेखावत देशात ऑन ड्युटी शहीद होणाऱ्या पहिल्या महिला अधिकारी आहेत. 24 मार्च 2015 ला गोव्यात डॉर्नियर विमान दुर्घटनाग्रस्त झाले, त्यात किरण शेखावत शहीद झाल्या.
पुनीता अरोरा –
पुनीता अरोरा भारतीय नौदलाच्या पहिल्या महिला लेफ्टिनेंट जनरल होत्या. 2004 मध्ये त्यांनी लेफ्टिनेंट जनरल हे पद स्विकारले होते. 2002 साली त्यांना विशिष्ट सेवा पदक देखील मिळाले होते. आपल्या 36 वर्षांच्या सेवेत त्यांना एकूण 15 पदक मिळाली.
पद्मावती बंधोपाध्याय –
पद्मावती बंधोपाध्याय यांना भारतीय हवाई दलाच्या पहिल्या एअर मार्शल होण्याचा मान मिळाला. त्या वैद्यकिय सेवेच्या महासंचालक देखील होत्या. 2002 मध्ये त्या हवाई दलाच्या एअर मार्शल झाल्या होत्या.
दिव्या अजित कुमार –
वयाच्या 21 व्या वर्षी सैन्याच्या स्वॉर्ड ऑफ ऑनर मिळवणाऱ्या दिव्या अजित कुमार पहिल्या महिला कॅडेट होत्या. त्यांनी शिक्षणात तीन सुवर्णपदक जिंकले आहेत. त्यांना डिसेंबर 2010 मध्ये सैन्याच्या वायू रक्षा कौरमध्ये नियूक्त करण्यात आले होते. 2016 साली प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने पहिल्यांदा परेडचे नेतृत्व देखील दिव्याने केले होते.
फायटर प्लेन पायलट –
बिहारमधील बेगुसराय येथील भावना कंठ, मध्य प्रदेशमधील रीवा येथील अवनी चतुर्वेदी आणि वडोदरातील मोहना सिंह 2016 साली हवाई दलात फायटर प्लेन पायलट झाल्या.
शांती तिग्गा –
शांती तिग्गा यांना सैन्याच्या पहिल्या महिला जवान बनण्याचा गौरव प्राप्त आहे. भरती प्रशिक्षणात त्यांनी आपल्या कामगिरीने सर्वांना प्रभावित केले व यासाठी त्यांना प्रशिक्षणात सर्वोत्त ट्रेनी म्हणून निवडण्यात आले होते.
गुंजन सक्सेना –
गुंजन सक्सेना यांना कारगिल गर्ल म्हणून ओळखले जाते. कारगिल युद्धातील आपल्या कामगिरीसाठी त्यांना शौर्य पुरस्कारने देखील सन्मानित करण्यात आले होते.
मेजर खुशबू कंवर –
प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने राजपथावरील परेडमध्ये आसाम रायफल्सच्या महिला सैनिकांच्या तुकडीचे नेतृत्व खुशबू कंवर यांनी केले होते. आसाम रायफल्सची महिला तुकडी पहिल्यांदाच प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये सहभागी झाली होती.
भावना कस्तूरी –
15 जानेवारी 2019 ला आर्मी डे च्या निमित्ताने आर्मी परेडचे नेतृत्व महिला अधिकारी लेफ्टिनेंट भावना कस्तूरी यांनी केले होते.