रंगपंचमीचे किंवा होळीचे रंग कपड्यांवरून हटविण्यासाठी…


रंगपंचमी किंवा होळीच्या दिवशी रंग खेळण्यासाठी म्हणून जुने, परत कधीही न वापरता टाकून दिले तरी चालतील असे कपडे आपण वापरत असतो. पण सध्या सोशल मिडियावर रंग खेळतानाची देखील छायाचित्रे शेअर केली जात असल्याने, रंग खेळताना वापरल्या जाणाऱ्या कपड्यांबद्दल लोक जास्त जागरूक राहू लागले आहेत. आता रंग खेळताना जुने कपडे वापरण्याची पद्धत जाऊन, खास रंगपंचमी करिता ब्रँडेड कपड्यांची खरेदी होऊ लागली आहे. अनेकदा होळी किंवा रंगपंचमी निमित्त आयोजित केल्या जाणाऱ्या मेजवानीमध्ये देखील जावे लागत असल्याने चांगले कपडे घालण्यावाचून पर्याय रहात नाही. मात्र एकदा रंग खेळून झाला, की त्या कपड्यांचे करायचे काय हा प्रश्न समोर उभा राहतो. कपडे चांगल्या ब्रँडचे असल्याने ते टाकून ही देववत नाहीत. अश्या वेळी हे कपडे साफ करण्यासाठी काही उपायांचा अवलंब केला तर हे कपडे स्वच्छ करून पुन्हा वापरण्याजोगे होऊ शकतात.

जर तुम्ही अगदी कमी प्रमाणात रंग खेळला असाल, तर तुमच्या कपड्यांवर देखील थोडाच रंग असेल. अश्यावेळी हे रंग काढण्यासाठी टूथपेस्टचा वापर करा. मात्र या करिता टूथपेस्ट पांढरीच हवी. या साठी जेल टूथपेस्टचा वापर करू नये. कपड्यांवर जिथे रंग लागला असेल, तो भाग ओलसर करून घेऊन त्यावर पेस्ट लावा. ही पेस्ट वाळेपर्यंत डागावर तशीच राहू द्यावी. पेस्ट वाळल्यानंतर नेहमीच्या कपड्याच्या साबणाने कपडा धुवून टाकावा.

कपड्यावर रंगांचे पडलेले डाग काढण्याकरिता नेल पेंट रिमूव्हरचा वापर करता येईल. कपड्यांवरील शाईचे डाग देखील नेल पेंट रिमूव्हरच्या मदतीने काढता येतात. यासाठी एक कापसाचा बोळा नेल पेंट रिमूव्हरने ओला करून घेऊन त्याने डाग हलक्या हाताने घासावेत. त्यानंतर कपडा साबणाने स्वछ धुवून घ्यावा. तसेच, कॉर्न फ्लोअर दुधामध्ये मिसळून हे पेस्ट डागांवर लावल्याने देखील डाग निघू शकतात. या साठी थोडे कॉर्न फ्लोअर दुधामध्ये मिसळून त्याची पेस्ट तयार करून घेऊन डागावर लावावी आणि वाळू द्यावी. ही पेस्ट वाळल्यानंतर कपडा साबणाने धुवून घ्यावा. रंगांचे डाग काढण्यासाठी अल्कोहोलचा वापर हा देखील चांगला पर्याय आहे.

Leave a Comment