कोरोनाच्या पार्श्वभूमीवर न्यूयॉर्कमध्ये आणीबाणी घोषित


न्यूयॉर्क : चीनमध्ये दहशत माजवल्यानंतर आता कोरोना व्हायरस जगभरात प्रचंड वेगाने पसरत आहे. न्यूयॉर्कचे राज्यपाल अॅड्रयू कुओमो यांनी कोरोना व्हायरसचे संकट लक्षात घेता न्यूयॉर्कमध्ये आणीबाणी घोषित केली आहे. कोरोनाची न्यूयॉर्कच्या न्यू रोशेल या भागात 23 जणांना लागण झाली आहे. तर कोरोनाने वेस्टचेस्टर काउंटी येथे 57 जण ग्रासले आहेत

आतापर्यंत 70 देशांमध्ये कोरोना व्हायरस पोहोचला आहे. अमेरिकेत कोरोनामुळे 19 जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाचा वाढता प्रभाव बघता अखेर न्यूयॉर्कच्या राज्यपालांनी आणीबाणी घोषित केली आहे. याबाबत आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर राज्यपालांनी माहिती दिली आहे.

न्यू रोशेलमधील परिस्थिती भयानक असून दिवसेंदिवस कोरोना आजाराला बळी पडणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत चालली असल्यामुळे परिस्थिती नियंत्रणात येणे जरुरीचे आहे. न्यूयॉर्कमधील स्थानिक आरोग्य विभाग कोरोनावर ताबा मिळवण्यास कमी पडत असल्यामुळे अतिरिक्त आरोग्य अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे, अशी माहिती न्यूयॉर्कच्या राज्यपालांनी दिली.

राज्यपाल अॅड्रयू कुओमो यांनी आणीबाणी दरम्यान कोणत्याही वस्तूची किंमत वाढवली गेली तर ते सहन केले जाणार नाही. हँड सॅनेटायझरची किंमत वाढवली गेली तर नागरिकांनी तातडीने सरकारकडे तक्रार करावी, असे आवाहन केले आहे. यासाठी राज्यपालांनी 800-697-1220 हा हेल्पलाईन नंबर जारी केला आहे. याशिवाय https://dos.ny.gov/consumerprotection/ या वेबसाईटवर तक्रार करण्याचे आवाहन राज्यपालांनी केले आहे.

Leave a Comment