दिशाभूल करणाऱ्या जाहिरातीमुळे टाटा मोटर्सला इतक्या लाखांचा दंड

अनेकदा कंपन्या खोटा प्रचार करत ग्राहकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करत असतात. अशाच एका प्रमाणात ऑटोमोबाईल कंपनी टाटा मोटर्सला साडेतीन लाख रुपये दंड भरण्याचे आदेश देण्यात आले आहे. चुकीची व दिशाभूल करणारी माहिती दिल्याने कंपनीला हा दंड ठोठवण्यात आला आहे.

कोलकत्ता येथील प्रदीप्ता कुंडू यांनी 2011 मध्ये टाटा इंडिगो कार खरेदी केली होती. कुंडू यांनी वृत्तपत्रात जाहिरात पाहिली होती की, कंपनीचे हे मॉडेल 25 किमी प्रती लीटरपर्यंत मायलेज देते. जाहिरातीमध्ये कंपनीने टाटा इंडिगोला देशातील सर्वाधिक फ्यूल इफिशियंट कार असल्याचा दावा केला होता. ही ऑफर मर्यादित कालावधीसाठी होती.

कुंडू यांनी कार खरेदी केली, मात्र त्यांना जाहिरातीत सांगितल्याप्रमाणे मायलेज मिळाले नाही. त्यांनी कंपनीशी देखील कार बदलण्याबाबत संपर्क साधला, मात्र कंपनीनी नकार दिला. यानंतर कुंडू यांनी कंपनीच्या विरोधात ग्राहक मंचात तक्रार दाखल केली.

या प्रकरणात नॅशनल कंझ्युमर डिस्प्यूट्स रिड्रेसल कमिशनने कंपनीला दोषी ठरवले व कंपनीला वाहनाच्या पुर्ण किंमतीसह दंड ठोठवला. फोरमने ग्राहकाला वाहनाची पुर्ण किंमत 4.8 लाख रुपयांसह दोन लाख रुपये दंड आणि राज्य ग्राहक कल्याण निधीमध्ये 1.5 लाख रुपये जमा करण्याचे आदेश दिले. टाटा मोटर्सने जिल्हा मंचाच्या निर्णयाविरोधात राज्य ग्राहक मंचाच्या विरोधात देखील धाव घेतली होती. मात्र तेथेही निर्णय कायम ठेवण्यात आला होता.

नवीन सरकारी नियमांनुसार, वाहन कंपन्यांनी स्पष्ट सांगावे की दावा केलेले मायलेज प्रत्यक्ष परिस्थितीत वेगळे असू शकते.

Leave a Comment