धरमपाजींच्या ‘ही मॅन’ ढाब्याला सील


फोटो सौजन्य नईदुनिया
बॉलीवूड मधला एके काळचा सुपरस्टार धर्मेंद्र यांनी हरियाणातील करनाल येथे १४ फेब्रुवारी म्हणजे व्हेलेंटाईन डे रोजी सुरु केलेल्या ‘ ही मॅन’ ढाब्यावर पोलिसांनी कारवाई केली असून ढाबा सील केल्याचे समजते. मालमत्ता कर संदर्भातल्या जुन्या प्रकरणात ही पोलिसी कारवाई केली गेल्याचे सांगितले जात आहे. या मालमत्तेचा कर नगरपालिकेकडे भरला गेला नसल्याचे समजते.

धर्मेंद्र यांनी ही मालमत्ता काही वर्षापूर्वी खरेदी केली असून त्याच्या पूर्वीच्या मालकाने कर भरलेला नाही असे समजते. त्यामुळे पोलिसांच्या मदतीने कारवाई केली जात असताना हॉटेल मधील नोकरांनी प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. धर्मेंद्र यांनी हा ढाबा सुरु करत असल्याची माहिती स्वतः त्यांच्या चाहत्यांना दिली होती. त्यासाठी त्यांनी ट्विटर आणि इन्स्टाग्रामवर सर्वाना उद्घाटनासाठी येण्याचे आमंत्रण दिले होते.

देशातील हे पहिले फार्म तो फोर्क रेस्टॉरंट असल्याचे सांगून धर्मेंद्र यांनी त्यांच्या शेतातील ताज्या भाज्या आणि फळांपासून येथील खाद्यपदार्थ बनविले जाणार असल्याचे सांगितले होते. आमंत्रण करताना धर्मेंद्र यांनी चाहत्यांना तुमच्या प्रेम आणि सन्मानाचा आदर करतो असेही म्हटले होते. या धाब्यातून होणाऱ्या कमाईचा एक भाग स्वयंसेवी संस्थेला दिला जाणार असून ही संस्था अनाथ मुलांचे शिक्षण आणि शहीद परीवारांसाठी काम करते. धर्मेंद्र यांनी या धाब्याची शाखा परदेशात सुरु करून इंटरनॅशनल चेन सुरु करण्याची योजना आखली आहे.

Leave a Comment