जगातली बेस्ट आई बनला हा बाबा


फोटो सौजन्य नवभारत टाईम्स
पुण्याच्या आदित्य तिवारी या सॉफ्टवेअर इंजिनीअरने जगातील ‘वर्ल्ड्स बेस्ट मॉम’ असा खिताब मिळविला आहे. ८ मार्च रोजी महिला दिनानिमित्त बंगलोर येथे होत असलेल्या एका कार्यक्रमात अन्य मॉमसोबत त्याला हे टायटल दिले जाणार आहे. एखादा बाबा आई कसा बनू शकतो याचा आदर्श आदित्यने समाजापुढे घालून दिला आहे. अर्थात त्यासाठी त्याला दीर्घकाळ कायदेशीर आणि सामाजिक लढाई लढावी लागली आहे.

२०१६ मध्ये आदित्यने डाऊन सिंड्रोम असलेल्या एका मुलाला दत्तक घेतले. तो सिंगल पॅरंट असल्याने त्याला अनेक कायदेशीर अडचणी आल्या तसेच समाज आणि घरातूनही खूप विरोध सहन करावा लागला. पण या मुलाच्या मायेपुढे आदित्यने या साऱ्या अडचणी पार केल्या. वर्ल्ड्स बेस्ट मॉम खिताब मिळाल्याचा त्याला नक्कीच आनंद वाटतोय. एक वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत तो म्हणाला, स्पेशल बाळाला सांभाळण्याचा माझा अनुभव मी अन्य पालकांशी शेअर करतोय.

आदित्यने अवनिश नावाच्या या स्पेशल बाळाला दत्तक घेतले तेव्हा अवनिश दोन महिन्याचा होता. त्याची आई त्याला अनाथालयाच्या पायरीवर टाकून गेली होती. अवनिशसाठी आदित्यने त्याची नोकरी सोडली आणि देशभर स्पेशल मुलांच्या पालकांना समुपदेशन आणि मोटिव्हेशन देण्यासाठी तो अवनिशसह फिरतो आहे. ही बापलेकाची जोडी आत्तापर्यंत २२ राज्यात फिरली आहे आणि ४०० जागी आदित्यने बैठका, चर्चा, वर्कशॉप असे कार्यक्रम घेतले आहेत. जगभरातील १० हजाराहून अधिक पालकांशी तो जोडला गेला आहे. संयुक्त राष्ट्र संघाकडून त्याला परिषदेसाठी बोलावले गेले आहे.

Leave a Comment