नव्या रुपातील डेक्कन क्वीन धावणार ताशी 140 किलोमीटर वेगाने


मुंबई – वर्षोंनुवर्ष पुणे ते मुंबई आणि मुंबई ते पुणे डेक्कन क्वीन अर्थात दख्खनची राणीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी खुशखबर असून आता नव्या स्वरुपात डेक्कन क्वीन प्रवाश्यांच्या सेवेत दाखल होणार आहे. मध्य रेल्वे प्रशासनाने प्रवाशांच्या सोयीसाठी डेक्कन क्वीनचा चेहरामोहरा बदलून टाकण्याचा निर्णय घेतला आहे.

आता अत्याधुनिक ‘एलएचबी’ (LHB) कोच डेक्कन क्वीनला लावण्यात येणार असून 17 वरुन 20 गाडीच्या डब्यांची संख्या करण्यात आली आहे. त्याचबरोबर गाडीचा वेगही वाढणार असल्याने ही गाडी आता ताशी 140 किलोमीटर वेगाने प्रवास करु शकेल. या बदलांमुळे डेक्कन क्वीनमधून अधिकाधिक प्रवासी प्रवास करु शकतील. त्याचबरोबर प्रवासाचा वेळही वाचेल. हे नवे बदल डेक्कन क्वीनच्या 1 जूनला असणाऱ्या वाढदिवसानिमित्त करण्यात येतील.

अहमदाबाद येथील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डिझाइन (एनआयडी) या संस्थेमार्फत कोचचे डिझाईन मागवण्यात आले असून ते रेल्वे प्रशासनाकडे 15 मार्चपर्यंत सादर होतील. त्याचबरोबर त्यांनी दिलेल्या 5 पैकी एक डिझाईन निश्चित करण्यात येईल. चेन्नई येथील ‘इंटिग्रल कोच फॅक्टरी’त ‘एलएचबी’ कोचची निर्मिती करण्यात येते. हे कोच वजनाने हलके असतील. त्यामुळे अपघातादरम्यान जीवितहानी टळू शकेल. प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने हे अत्यंत महत्त्वाचे आहे. सध्या पांढऱ्या आणि निळ्या रंगाचे असलेले कोच बदलण्यात येणार असून ‘एलएचबी’ कोच अधिक आकर्षक रंगसंगतीत प्रवाशांना पाहायला मिळणार आहेत.

त्याचबरोबर डेक्कन क्वीनचा नवीन बदलांनंतर ताशी 120 किलोमीटर असलेला वेग ताशी 140 किलोमीटर होणार आहे. त्यामुळे प्रवासासाठी लागणाऱ्या वेळेत नक्कीच घट होईल. परिणामी पुणे-मुंबई हा सव्वातीन तासांत होणारा प्रवास पावणेतीन तासात होईल.

Leave a Comment