येस बँकेमधील प्रत्येक ठेवीदारांची रक्कम सुरक्षित – केंद्रीय अर्थमंत्री


नवी दिल्ली – केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी शुक्रवारी येस बँकेच्या खातेदारांनी चिंता करण्याचे अजिबात कारण नाही. प्रत्येक ठेवीदारांची बँकेतील सर्व रक्कम सुरक्षित असल्याचे स्पष्ट केले असून रिझर्व्ह बँकेने गुरुवारी रात्री येस बँकेवर निर्बंध घातले. या बँकेच्या खातेदारांना सध्या केवळ ५० हजार रुपयेच काढता येताहेत. निर्मला सीतारामन यांनी त्या पार्श्वभूमीवर हे वक्तव्य केले.

निर्मला सीतारामन म्हणाल्या, आमचे येस बँकेसंदर्भातील सर्व घडामोडींवर लक्ष आहे. आता या संदर्भात रिझर्व्ह बँकेने एक आराखडा तयार केला आहे. लवकरच या प्रकरणी मार्ग शोधण्यात येईल. या प्रकरणावर केंद्र सरकार आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया हे दोन्हीही लक्ष ठेवून असल्यामुळेच ठेवीदारांनी काळजी करण्याचे कारण नाही त्याचबरोबर त्यांचे पैसे सुरक्षित आहेत.

त्याचबरोबर सर्व ठेवीदारांचे हित लक्षात घेऊन निर्णय घेण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. येस बँकेतून सध्या ५० हजार रुपयेच काढता येत असले तरी अधिक रक्कम कोणत्या खातेदाराला हवी असेल तर त्याने मार्गदर्शक सूचनांप्रमाणे आपली मागणी करणे आवश्यक असल्याचेही त्यांनी सांगितले. दरम्यान, येस बँकेसंदर्भात लवकरच तोडगा काढला जाईल. यासाठी ३० दिवसांची मुदत ही जास्तीत जास्त आहे. पण त्याआधीच निर्णय घेतला जाईल, असे रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी शुक्रवारी सकाळी सांगितले.

Leave a Comment