भाजप आमदाराचे चक्क कोरोना व्हायरसलाच ओपन चॅलेंज


नवी दिल्ली – चीनमध्ये थैमान घातल्यानंतर जगभरातील अनेक देशांमध्ये कोरोना व्हायरस आपले पाय पसरवत असतानाच इराणमधून नुकताच मायदेशी परतलेल्या गझियाबादमधील एका व्यक्तीला कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाल्याने आता देशात कोरोनाची लागण झालेल्यांची संख्या ३० झाली आहे. जगभरात तीन हजारहून अधिक जणांचा बळी घेणाऱ्या कोरोना व्हायरसचा भारतात शिरकाव झाल्याने चिंता व्यक्त केली जात असतानाच थेट या व्हायरसलाच उत्तर प्रदेशमधील भाजपच्या एका नेत्याने आव्हान दिले आहे.

भाजपचे आमदार नंदकिशोर गुर्जर यांनी कोरोनामध्ये हिम्मत असले तर माझ्या मतदारसंघामध्ये घुसून दाखवावे असे आव्हान यांनी केले आहे. माझा मतदारसंघ असणाऱ्या लोनीमध्ये कोरोना व्हायरसमध्ये हिंमत असेल तर त्याने घुसून दाखवावे, असे वक्तव्य एका पत्रकाराला फोनवर दिलेल्या मुलाखतीमध्ये गुर्जर यांनी केले आहे. सध्या सोशल मीडियावर संवादाची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे.

लोनीमध्ये रामराज्य असून आमच्याकडे नऊ गोशाळा आहेत. धर्म अन् कर्माबद्दल माझ्या मतदारसंघातील लोक जागरुक असून गाईचा जिथे वास आहे तिथे जगातील कोणताही व्हायरस शिरकाव करु शकत नसल्याचा दावा गुर्जर यांनी केला आहे. कोरोनाच काय तर इतर कोणताही व्हायरस माझ्या मतदारसंघात येऊ शकत नसल्याचा विश्वास गुर्जर यांनी व्यक्त केला आहे.

गुर्जर कोरोनाला केवळ आव्हान देऊन एवढ्यावरच थांबले नाहीत तर त्यांनी कोरोनाचा समूळ नायनाट करु असेही वक्तव्य केले आहे. माझ्या मतदार संघातील नागरिकांना कोणत्याही व्हायरसने त्रास दिला अथवा मारण्याचा प्रयत्न केला किंवा आजार पसरवण्याचा प्रयत्न केला तर त्याच्यासाठी आम्ही पुरेसे आहोत. त्याला आम्ही ठीक करु. कोणताही व्हायरस लोनीमध्ये वाचणार नाही आणि येथे कोणता व्हायरस येणारच नाही ही आमची जबाबदारी असल्याचे गुर्जर म्हणाले.

Leave a Comment