आपली डेट ‘ हटके ‘ होण्यासाठी…


आजकाल ‘ डेट ‘ वर जाणे हा प्रकार आपल्याला अजिबात नवीन राहिलेला नाही. कित्येक तरुण – तरुणी, किंवा प्रौढ व्यक्ती आपल्या जोडीदारासमवेत निवांत वेळ घालविणे पसंत करतात. हा वेळ केवळ या दोघांचाच असल्याने बहुतेक कपल्स आपली ‘ डेट ‘ यादगार असावी अशी अपेक्षा करीत असतात. त्यामुळे आपल्या जोडीदारासाठी काही तरी खास प्लॅन करण्याकडेही बहुतेकांचा कल असतो. त्यामुळे ‘ कँडल लाईट डिनर ‘, किंवा एखाद्या सुपरहिट सिनेमाची तिकिटे, किंवा एखाद्या पब मध्ये ‘इव्हनिंग आऊट’, असे डेट चे प्लॅन असू शकतात. पण आपली डेट आपल्याला याही पेक्षा काही वेगळी, ‘हटके’ करायची असेल, तर डेट साठी अगदी नेहमीच्या कार्यक्रमाच्या चौकटीतून बाहेर पडून, वेगळे काय करता येईल याचा विचार करता येईल.

आपल्या शहराची विशेषता असणारी किती तरी सुंदर ठिकाणे आपल्या शहरामध्ये असतील. जर तुम्हाला व तुमच्या जोडीदाराला भ्रमंतीची आवड असेल, तर आपल्या शहरातील किंवा शहराच्या आसपासच्या प्रसिद्ध ठिकाणांना भेट देण्याचा विचार करा. आजकाल बहुतेक शहरांमध्ये सिटी टूर आयोजित करणाऱ्या कंपन्या असतात, त्यांच्या मार्फेत सिटी टूर बुक करून तुम्ही सर्व शहरातील प्रसिद्ध ठिकाणे आपल्या जोडीदारासमवेत पाहू शकता. किंवा सुटीच्या दिवशी आपल्या जोडीदारासमवेत ‘लॉंग ड्राईव्ह’ वर जाण्याचा विचार करू शकता.

आपण डेट वर जाताना नेहमीच एखाद्या आलिशान रेस्टॉरंट मध्ये जेवण घेत असतो. पण कधी तरी एखाद्या महागड्या फाइव्ह स्टार रेस्टॉरंटमध्ये जेवण्यापेक्षा आपल्या शहरातील खान-पानातील ‘ स्पेशालिटी ‘ जिथे मिळत असतील, अश्या स्थानिक फुड जॉईंट्स कडे मोर्चा वळवा. कधी कधी एखाद्या फॅशनेबल रेस्टॉरंटमधील कँडल लाईट डिनर पेक्षा कॉलेजच्या कट्ट्यावर मजेत गप्पा मारीत एकत्र घालविलेला वेळ अधिक आनंद देऊन जातो.

सिनेमाला जाण्यापेक्षा जर तुम्हाला आणि तुमच्या जोडीदाराला आवड असेल, तर एखाद्या सांस्कृतिक कार्यक्रमाला हजेरी लावा. आजकाल शहरामध्ये किंवा शहराच्या आसपास अनेक ठिकाणी तऱ्हे-तऱ्हेचे इव्हेंट्स आयोजित केले जात असतात. या इव्हेंट्स मध्ये सहभाग घ्यावा. फिटनेसच्या बाबतीत जागरुक असणाऱ्या जोडप्याने एखाद्या मॅरेथॉनमध्ये किंवा एखाद्या सायकलिंग इव्हेंट एकत्र भाग घेऊन आपली ‘ डेट ‘ हटके पद्धतीने साजरी करण्याचा विचार करावा. अनेकदा कित्येक ठिकाणी कविता वाचनासारखे कार्यक्रम होत असतात, किंवा कलाकृतींची प्रदर्शने भरत असतात. आपल्या आणि आपल्या जोडीदाराच्या आवडी निवडी लक्षात घेऊन अश्या ठिकाणी जाण्याचा विचार करता येईल.

रोजच्या धकाधकीच्या जीवनापासून दूर होण्यासाठी, आवड असल्यास एखाद्या मेडीटेशन इव्हेंटमध्ये सहभागी होऊन आपली ‘डेट’ नेहमीपेक्षा वेगळ्या रीतीने साजरी करता येईल. किंवा शहराच्या बाहेर एखाद्या ठिकाणी हायकिंग, किंवा ट्रेकिंग ला जाण्याची कल्पना देखील विचार करण्याजोगी आहे. अश्या तर्हेने जरा वेगळ्या प्रकारे एकत्र घालविलेला काळ आपली ‘ डेट ‘ यादगार करण्यात नक्कीच उपयोगी पडेल.

Leave a Comment