या गोष्टींमुळे बिघडू शकतात पती-पत्नी मधील संबंध


पती-पत्नींचे परस्परांवरील प्रेम आणि विश्वास या दोन गोष्टींवर त्यांचे नाते अवलंबून असते. ह्या दोन्ही भावना पतिपत्नींना एकमेकाशी मनाने जोडून ठेवतात. एकमेकांवरील विश्वास आणि परस्परांसाठी समर्पणाची भावना त्यांच्या नात्याचा पाया असतो. क्वचित प्रसंगी हे नाते पती किंवा पत्नीच्या हातून घडणाऱ्या काही गोष्टींमुळे डळमळू लागते, कमकुवत होते. एखादी लहानशी गोष्ट देखील ह्या नात्याचे बंध कमकुवत करण्यासाठी पुरेशी असते. त्यामुळे पती-पत्नींनी आपले नाते समजूतदारपणे जपायला हवे, आणि त्याचबरोबर काही गोष्टी आवर्जून टाळायला हव्यात.

कधी काळी कुठल्या गोष्टीवरून वाद निर्माण झाले, तर रागाच्या भरात पती-पत्नी, परिस्थितीसाठी कोण जबाबदार आहे यासंबंधी आरोप-प्रत्यारोप करीत असतात. घडलेल्या चुकीचे खापर एकमेकांच्या माथी फोडण्याची चढाओढ सुरु होते. पण हे करण्यापेक्षा झालेल्या चुकीची जबाबदारी स्वीकारून समोर असलेल्या कठीण परिस्थितीतून कसा मार्ग काढता येईल याचा विचार दोघांनी करायला हवा. परिस्थिती कितीही बिकट असली, तरी त्यातून सामंजस्याने मार्ग काढता येतो हे लक्षात घेऊन, जे होऊन गेले, त्यासाठी एकमेकांना जबाबदार न धरता, त्या समस्येतून बाहेर कसे पडता येईल, याचा विचार करावा.

पती पत्नीच्या सहजीवनामध्ये प्रत्येक गोष्ट पतीच्या किंवा पत्नीच्या मनासारखी घडतेच असे नाही. कित्येकदा मनात नसताना देखील आपल्या जोडीदाराचे मन राखण्यासाठी पती किंवा पत्नी आल्या परिस्थितीचा किंवा एखाद्या निर्णयाचा स्वीकार करीत असतात. असे अनेक लहान मोठे इच्छा-आकांक्षांचे त्याग पती आणि पत्नी दोघांना करावे लागतात. त्यासाठी मनामध्ये परस्परांविरुद्ध राग असणे, किंवा एकमेकांचा द्वेष करणे, ही भावना नातेसंबंध कमकुवत करते. कोणताही निर्णय घेण्याआधी पती-पत्नींनी एकमेकांशी सविस्तर चर्चा करायला हवी. तरच तो निर्णय मनापासून स्वीकारण्याची मानसिक तयारी होऊन, त्या निर्णयावरून कोणतेही गैरसमज किंवा वादंग टाळता येतील.

आजकालच्या धकाधकीच्या जीवनामध्ये पती-पत्नीला एकमेकांसाठी वेळ देणे कठीण झाले आहे. व्यवसायासंबंधीची कामे, कौटुंबिक जबाबदाऱ्या या सगळ्यामधून त्यांना एकमेकांसाठी वेळ देणे शक्य होत नाही. एकमेकांसाठी वेळ देतानाच पतीला आणि पत्नीला स्वतःची खासगी ‘स्पेस’ देणेही आवश्यक आहे. आजकाल कित्येक पती-पत्नी कामाच्या किंवा व्यवसायाच्या निमित्ताने वेगवेगळ्या शहरांमध्ये स्थायिक असतात. अश्या जोडप्यांना फोनच्या माध्यमातून संभाषण साधण्याखेरीज कोणताच पर्याय नसतो. त्यामुळे या संभाषणाच्या माध्यमातून एकमेकांशी सतत संपर्कात राहणे अगत्याचे आहे.

एखाद्या गोष्टीबद्दल आपल्या जोडीदाराशी चर्चा करताना, जी वस्तुस्थिती आहे, ती जशीच्या तशी आपल्या जोडीदारासमोर मांडवी. कुठलीही गोष्ट कमीजास्त करून सांगणे, किंवा आहे त्यापेक्षा वेगळी करून सांगणे टाळायला हवे. एखाद्या बाबतीत आपली चूक झाली आहे असे वाटत असेल, तर आपली चूक लपविण्याकरिता इतर कोणाला जबाबदार ठरविणे अगत्याने टाळायला हवे. पती पत्नींचा एकमेकांवरील विश्वास कोणत्याही कठीण परिस्थितीतून मार्ग काढण्यास सक्षम असतो. तसेच सहजीवनामध्ये उद्भविलेल्या कोणत्याही प्रकारच्या परिस्थितीला सामोरे जाताना पती-पटींनी एकमेकांची साथ द्यावी. आर्थिक नुकसान, गंभीर आजारपणे, कौटुंबिक वाद या सारख्या परीष्टीतींमध्ये पती-पत्नींच्या नात्याचा कस लागत असतो. जर ह्या कठीण काळी दोघांनी एकमेकांची साठ दिली, तर ह्या परिस्थितीचा सामना करण्यासाठी लागणारे मानसिक धैर्य एकमेकांच्या सहवासातून त्यांना मिळते, आणि आल्या अडचणीला तोंड देण्याची हिंमत निर्माण होते.

Leave a Comment