कोट्याधीश सचिन बंसलविरोधात हुंड्यासाठी छळ प्रकरणी गुन्हा दाखल


नवी दिल्ली : बंगळुरूच्या कोरामंगळा पोलीस स्थानकात फ्लिपकार्टचे सहसंस्थापक सचिन बंसल यांच्या पत्नीने हुंड्यासाठी छळ केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. सचिन बंसल, त्याचे वडील सतप्रकाश अग्रवाल, आई किरण बंसल आणि भाऊ नितीन बंसल यांच्या नावाचा एफआयआर नोंदविण्यात आलेल्या चार जणांमध्ये समावेश आहे. सध्याच्या घडीला सचिन बंसल 6 हजार कोटींचे मालक आहे. त्यांनी नुकतेच फ्लिपकार्टमधील आपले काही शेअर विकले होते.

2000मध्ये सचिन आणि प्रिया बंसल यांनी लग्न केले होते, प्रियाने त्या तक्रारीत आरोप केला आहे की सचिन आणि त्याच्या कुटुंबीयांनी लग्नानंतर हुंडा मागण्यास सुरवात केली. प्रियाने 28 फेब्रुवारी रोजी केलेल्या तक्रारीत, 50 लाख रुपये वडिलांनी लग्नासाठी खर्च केले आहेत आणि सचिनला 11 लाख रुपये रोख दिले आहेत. दरम्यान न्यायालयाच्या नोंदीनुसार सचिन बंसलची आई किरण बंसल यांनी काही आठवड्यांपूर्वी आपल्या सुनेच्या विरोधात गुन्हा दाखल केला होता.

व्यवसायाने सचिनची पत्नी प्रिया दंतचिकित्सक असून, सचिनने तिला मारहाण केल्याचा आरोप केला आहे. सचिनने गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये मारहाण केल्याचा आरोप प्रियाने केला आहे. त्याचबरोबर सचिन यांनी एकत्रित सर्व मालमत्ता देण्यासही सांगितले होते. सचिन दिल्लीत गेला तेव्हा त्याने आपल्या बहिणीचा लैंगिक छळ केल्याचा गंभीर आरोपही प्रियाने केला.

सचिनविरोधात प्रियाने 498 ए (हुंडा उत्पीडन), 34 (गुन्हेगारी हेतू) आणि हुंडा निषिद्ध कायद्याच्या कलम 3 आणि 4 अंतर्गत एफआयआर दाखल केला आहे. त्याचवेळी सचिन बंसल यांनी 28 फेब्रुवारी रोजी जामिनासाठी अर्ज केला असून आज गुरुवारी त्याचा निर्णय सुनावण्यात येणार आहे.

Leave a Comment