सर्दी बरी होण्यासाठी दैनंदिन आहारामध्ये हे बदल करा


थंडीच्या मोसमामध्ये सर्दी पडशाचा त्रास हा, या काळादरम्यान उद्भविणाऱ्या सर्वसामान्य विकारांपैकी एक आहे. या कारणानेच शरीरामध्ये उष्णता निर्माण करतील असे अन्नपदार्थ या काळामध्ये आपल्या आहारामध्ये समाविष्ट करण्याची, व काही पदार्थ वर्ज्य करण्याची परंपरा आपल्याकडे पूर्वापार चालत आली आहे. या काळामध्ये भाज्यांपासून बनविलेली सूप्स, तीळ, गूळ, इत्यादी पदार्थांचे सेवन जास्त खाण्याचा, आणि दही, केळी, व इतर थंड पदार्थांचे सेवन कमी प्रमाणात करण्याचा सल्ला दिला जातो. आता त्यामध्ये नेमका कोणता सल्ला मानवा हे आपल्याला सुचत नाही. त्यामुळे आहारामध्ये विचारपूर्वक काही बदल केल्याने सर्दी लवकर बरी होण्यास, व पुन्हा न उद्भविण्यास मदत होते.

सर्दी किंवा खोकला झाला की काही लोक केळ्यांना अजिबात फाटा देऊन टाकतात. केळे खाल्ल्याने छातीमध्ये कफ वाढेल, व सर्दी-खोकला लवकर बरा होणार नाही अशी सर्वसाधारण समजूत पहावयास मिळते. पण केळ्यामध्ये पोटॅशियम मोठ्या प्रमाणावर असून, आपल्या शरीरातील पाण्याची पातळी त्यामुळे नियंत्रित होते. तसेच केळ्यामधील कॅलरीज शरीराला आवश्यक ती ऊर्जा देतात. यामध्ये असलेले इलेक्ट्रोलाईट्स आणि क्षार शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढवितात. त्यामुळे सर्दी झालेली असताना देखील केळ्याचे सेवन करावे.

वैज्ञानिकांच्या मते क जीवनसत्व असलेली सर्व फळे व भाज्या शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढविणारी असून, त्यांच्या सेवनाने शरीराचा कोणत्याही इन्फेक्शन पासून बचाव होण्यास मदत होते. क जीवनसत्व शरीरातील हाडे, पेशी आणि रक्तवाहिकांचे आरोग्य चांगले ठेवण्यास मदत करते. तसेच आपण सेवन करीत असलेल्या अन्नामधील लोह शरीरामध्ये शोषले जाण्यासाठी देखील क जीवनसत्व मदत करीत असते. त्यामुळे सर्दी झालेली असताना देखील संत्री, पपई, टोमॅटो, आवळे, पेरू यासारख्या पदार्थांचे सेवन करणे अपायकारक नाही.

दह्याच्या सेवनाने आपण सेवन करीत असलेले अन्न लवकर पचण्यास मदत होते. दह्यामध्ये असलेले ‘ हेल्दी बॅक्टेरिया अन्नाच्या पचनास मदत करतात. त्यामुळे जर हवामान बदलल्यामुळे सर्दी झाली असेल, तर दही खाण्यास हरकत नाही. मात्र जर सतत सर्दी किंवा खोकला उद्भवत असेल, तर दही खाण्याआधी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा. तसेच रात्रीच्या वेळी दही, ताक हे पदार्थ खाणे टाळावे. तसेच काही व्यक्तींना दुध आणि दुग्धजन्य पदार्थांच्या सेवनाने कफ होतो. अश्या व्यक्तींनी हे पदार्थ डॉक्टरांचा सल्ला विचारून मगच आहारामध्ये समाविष्ट करावेत. तसेच सर्दी झालेली असताना मैद्यापासून बनलेले पदार्थ, तळलेले पदार्थ, किंवा पचण्यास जड पदार्थ खाणे टाळावे.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment