ब्लड शुगर वाढल्याचे कसे ओळखाल?


ब्लड शुगर लेव्हल वाढणे, म्हणजेच हायपरग्लायसिमिया हा अमेरिकेमध्ये ‘ सायलेंट किलर ‘ म्हणून ओळखला जाणारा विकार आहे. भारतामध्ये ही डायबेटिस या विकाराने ग्रस्त असणाऱ्या लोकांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. मानसिक तणाव, व्यायामाचा अभाव, किंवा इतर काही विकारांमुळे ब्लड शुगर लेव्हल्स वाढताना आढळतात. ह्या अवस्थेचे वेळेवर निदान केले गेले नाही, तर रुग्णाच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो.

शुगर लेव्हल वाढण्यासाठी, तुम्ही त्यापूर्वीच्या काही तासांमध्ये काय खाल्ले आहे, हे पाहणे अतिशय महत्वाचे ठरते. ब्लड शुगर लेव्हल्स वाढल्याने शरीरातील पेशी आणि अवयवांना धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे एखाद्या व्यक्तीच्या ब्लड शुगर लेव्हल्स सतत वाढत असतील, तर त्याने तातडीने डॉक्टरांचा सल्ला घेणे अतिशय महत्वाचे आहे. ब्लड शुगर लेव्हल सरासरी पातळीपेक्षा अधिक वाढली आहे हे दाखवून देणारी काही लक्षणे शरीरामध्ये निर्माण होतात. ही लक्षणे दिसून आली, तर त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

तोंड कोरडे पडत असून, सतत तहान लागणे हे ब्लड शुगर वाढल्याचे लक्षण असू शकते. अश्या वेळी रुग्णाच्या तोंडाला सतत कोरड पडते. कितीही पाणी प्यायले तरी तहान भागत नाही. अश्या वेळी खूप जास्त पाणी प्यायले जाते आणि परिणामी सतत लघवीला जावे लागते. खूप पाणी प्यायल्याने खरे तर लघवीचा रंग शुभ्र असायला हवा. पण ब्लड शुगर वाढली असल्यास कितीही पाणी प्यायले तरी लघवीचा रंग गडद दिसतो. अश्या वेळी ब्लड शुगर वाढली आहे हे ओळखून त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

ब्लड शुगर जर वाढली असेल, तर दृष्टी काहीशी कमकुवत होऊ लागते. रुग्णाला थोडी लांब असलेली वस्तू स्पष्ट न दिसता, धूसर दिसू लागते. त्याचबरोबर हात पाय सतत गार पडू लागतात. तसेच हातापायांना सतत मुंग्या आल्याची भावना होते. हे लक्षण ही ब्लड शुगर वाढली असल्याचे दर्शविते.

ब्लड शुगर वाढली असल्यास रुग्ण सतत चिडचिड्या मनस्थितीत असतो, तसेच त्याला सतत शारीरिक थकवा जाणवतो. कुठल्याही गोष्टीवर मन एकाग्र करणे त्याला जड जाते. वजन अचानक वाढते, किंवा अचानक कमी होते. त्याचबरोबर एखादी झालेली जखम भरून येण्यास वेळ लागतो. ही सर्व लक्षणे ब्लड शुगर वाढली असण्याची आहेत. ही लक्षणे जाणवत असल्यास वैद्यकीय सल्ला घेऊन योग्य ते निदान व औषधोपचार करवून घ्यावेत.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment