नवी दिल्ली – देशामधील कोरोना ग्रस्तांची संख्या 28 वर पोहोचली असून दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी राज्यातील हिंसाचार आणि कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर आपण होळी खेळणार नसल्याचे म्हटले आहे. दरम्यान काल पंतप्रधान नरेंद्र मोदींनी यंदा होळी खेळणार नसल्याचे जाहीर केले आहे.
यंदा अरविंद केजरीवालही खेळणार नाही होळी
मी यंदा होळी दिल्ली हिंसाचार आणि कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर साजरी करणार नाही. दुर्दैवी असा हिंसाचार दिल्लीमध्ये झाला असून अनेकजण त्यामध्ये ठार झाले आहेत. अशा दु:खाच्या क्षणी मी किंवा माझ्या पक्षातील इतर कोणताही मंत्री आणि आमदार होळी खेळणार नाही, असे अरविंद केजरीवाल यांनी सांगितले आहे.
कोरोना व्हायरसचा फैलाव होऊ नये, यासाठी एखाद्या ठिकाणी गर्दी न करण्याचा सल्ला जगभरातील तज्ज्ञांनी दिला आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यंदा आपण होळी खेळणार नसल्याचे ट्विट करुन जाहीर केले आहे. तसेच भाजप पक्षाचे अध्यक्ष जे.पी.नड्डा यांनी प्रदेशाध्यक्षांना होळीचे कार्यक्रम राज्यात आयोजित करु नये, असे सांगितले आहे. कोरोना विषाणूचा संसर्ग झालेला रुग्ण सर्वांत प्रथम चीनमधील वुहान प्रांतात आढळला होता. यानंतर जगभरातील देशांमध्ये या विषाणूचा वेगाने प्रसार झाला.