निर्भयाच्या दोषींचे चौथे डेथ वॉरंट जारी, या तारखेला होणार फाशी


नवी दिल्ली – संपूर्ण देशाला हादरवून टाकणाऱ्या निर्भया सामूहिक बलात्कार आणि ह्त्या प्रकरणातील दोषींना अखेर 20 मार्चला सकाळी 5.30 ला फाशी देण्याचे ठरले आहे. या दोषींचे न्यायालयाने चौथ्यांदा डेथ वॉरंट जारी केले आहे. याआधी तीन वेळा फाशीची तारीख आणि वेळ निश्चित झाल्यानंतर दोषींपैकी कुणी ना कुणी न्यायालयात धाव घेतल्यामुळे डेथ वॉरंट रद्द झाले होते. तीन वेळा रद्द झाल्यानंतर आता चौथ्यांदा न्यायालयाने वॉरंट जारी केले आहे. पण यावेळी दोषींना फाशी नक्की दिली जाईल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.

20 मार्च रोजी सकाळी निर्भयाच्या चारही गुन्हेगारांना एकाचवेळी फाशी देण्यात येईल. यापूर्वी 3 मार्च फाशीची तारीख ठरली होती. पण एक दोषी पवनकुमार गुप्ता याची क्युरेटिव्ह याचिका दाखल केल्याने सुनावणी सुरू झाली आणि फाशी रद्द झाली. पवनची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्यानंतर त्याची दया याचिका राष्ट्रपतींनीही फेटाळली आहे. आतापर्यंत सर्व कायदेशीर पर्यायांचा पवन कुमारने अवलंब केला असून आता त्यांची फाशी अटळ असल्याचे सांगितले जात आहे.

आपल्या हातून जेव्हा हा गुन्हा घडला तेव्हा आपण अल्पवयीन असल्याचा दावा त्याने केला होता. त्या पार्श्वभूमीवर त्याच्या फाशीच्या शिक्षेत बदल करुन जन्मठेप द्यावी अशी विनंती करण्यात आली आहे. दुसरा दोषी अक्षय यानेसुद्धा नव्याने दया याचिका दाखल केली होती. पण त्याचीही याचिका फेटाळण्यात आली आहे. चार दोषींपैकी पवन हा क्युरेटिव्ह याचिका करणारा शेवटचा गुन्हेगार आहे. फाशीऐवजी आजीवन कारावासाची शिक्षा द्यावी, अशी त्याची विनंती आहे.

17 फेब्रुवारीला चारही दोषींना 3 मार्चला एकत्रित फाशी द्यायचा निर्णय दिल्ली न्यायालयाने दिला होता. न्यायालयाने आतापर्यंत या चौघांसाठी तीन वेळा डेथ वॉरंट जारी केले आहे. पहिल्या दोन वेळेला दोषींनी कायद्याने ठोठावल्याने फाशीची तारीख पुढे ढकलावी लागली. तिसऱ्यांदा डेथ वॉरंट जारी झाले होते. पण याहीवेळी फाशीच्या आधी दोन दोषींनी याचिका दाखल केल्या होत्या.

Leave a Comment