कोरोना व्हायरस: राजधानी दिल्लीत सुरु झाला मास्कचा काळाबाजार


नवी दिल्ली – चीनमध्ये थैमान घातल्यानंतर कारोनाचा प्रसार जगभरामधील अनेक देशांमध्ये वाढत असून भारतातही २८ कोरोनाग्रस्त रुग्ण सापडल्यामुळे देशातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. दिल्ली आणि परिसरामध्ये कोरोनाच्या विषाणूपासून संरक्षण करण्यासाठी तोंडाला लावण्याच्या मास्कची मागणी वाढली आहे. पण मास्कचा मेडिकल स्टोअरमध्ये तुटवडा निर्माण झाल्यामुळे मास्कचा शहरात काळाबाजार सुरू झाल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

नागरिकांना दिल्लीतील बख्तावरपूर परिसरात मेडिकलमध्ये मास्क मिळत नाहीत. मास्कची सुरुवातील विक्री कमी होती. पण आता मास्कची मागणी वाढल्यामुळे दुप्पट-तिप्पट किमतीत मास्क मिळत असल्याचे मेडिकल चालकांनी सांगितले. या काळ्या बाजारामुळे सर्वसामान्य नागरिकांना मास्क मिळणे मुश्किल झाले आहे.

दिडशे रुपयांना मिळणाऱ्या मास्कची किंमत आता ४०० रुपये असल्याचे दुकानदारांनी सांगितले. कोरोना व्हायरसला रोखण्यासाठी सरकार अनेक उपाययोजना करत आहे. पण, सुरक्षिततेसाठी वापरण्यात येणाऱ्या मास्कमध्ये काळाबाजार होत असेल तर आम्ही आमचे रक्षण कसे करायचे? असा प्रश्न नागरिकांमधून विचारला जात आहे.

भारतामध्येही सध्या कोरोना विषाणूची दहशत पसरली आहे. यापार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्री हर्षवर्धन यांनी पत्रकार परिषद घेतली असून देशामध्ये कोरोनाबाधित रुग्णाची संख्या 28 वर पोहचल्याची माहिती दिली. कोरोनाची लागण रोखण्यासाठी यंत्रणा सज्ज असल्याचे त्यांनी सांगितले. केंद्रीय आरोग्य मंत्र्यांनी कोरोना रुग्णासाठी स्वतंत्र वार्ड करण्याचे आदेश रुग्णालयाला दिले आहे. भारतात आलेल्या पर्यटकांची तपासणी सुरू आहे. संशयित लोकांना निरीक्षणाखाली ठेवण्यात येत आहे.

Leave a Comment