केवळ या एका उपायाने रोखू शकाल केसगळती


आजकाल प्रदूषण, हार्मोन्स मधील असंतुलन, मानसिक तणाव, आहाराद्वारे शरीराला मिळणारे अपुरे पोषण या आणि अश्या अनेक कारणांनी केस गळतीची समस्या उद्भविण्याचे प्रमाण वाढू लागले आहे. अगदी लहान वयातच केस गळतीच्या समस्येने त्रासलेले अनेक जण आपण नेहमी पहात असतो. एकदा सुरु झालेली ही केस गळती अनेक महागडे शँपू, हेअर सिरम, हेअर स्पा, निरनिराळी हेअर ऑइल्स असे अनेक उपाय करूनही थांबत नाही. पण आता एक साधा आणि सोपा उपाय करून केसगळती थांबविण्यात यश येऊ शकते. हा उपाय करण्यासाठी कोणत्याही डॉक्टरकडे किंवा पार्लर मध्ये जाण्याची गरज नाही. ह्या उपायासाठी वापरला जाणारा पदार्थ आपल्यापैकी बहुतेकांच्या घरामध्ये असतोच. हा पदार्थ म्हणजे कांदा.

वैज्ञानिकांच्या म्हणण्यानुसार कांद्यामध्ये डायटरी सल्फर असते. ह्या सल्फरमधे असणारे अॅमिनो अॅसिड्स हा प्रथिनांचा एक महत्वपूर्ण भाग आहेत. ही प्रथिने आणि विशेषतः केराटीन केसांच्या वाढीकरिता अतिशय फायदेशीर आहे. याशिवाय कांदा, पोटॅशियम, क, अ आणि ई जीवनसत्वाचे उत्तम स्रोत आहे. ही सर्व पोषक तत्वे केस गळती रोखून केसांच्या उत्तम वाढीस मदत करणारी आहेत.

कांद्याचा रस केसांना आणि केसांच्या मुळांशी लावल्यास त्यातील पोषक द्रव्ये केसांच्या मुळांमध्ये शोषली जातात. ह्या पोषक द्रव्यांमुळे केसांचा मुळे बळकट होऊन केस गळती कमी होते. कांद्याच्या रसामध्ये असलेले सल्फर केसांना मजबूत आणि दाट बनण्यास मदत करते. केसांना कांद्याचा रस लावण्यासाठी योग्य पद्धतीचा अवलंब केला जाणे गरजेचे असते.

कांद्याचा रस केसांना लावण्यासाठी सर्वप्रथम कांदा सोलून त्याचे लहान तुकडे करावेत. त्यानंतर हे तुकडे मिक्सरमधून वाटून घेऊन, त्याची जाडसर पेस्ट बनवून घ्यावी. एक पातळ कपडा घेऊन त्यामधून ही पेस्ट गाळून घेऊन रस काढून घ्यावा. हा रस नारळाच्या, बदामाच्या तेलामध्ये किंवा ऑलिव्ह ऑईल मध्ये मिसळावा. हे मिश्रण चांगले ढवळून घेऊन मग केसांना आणि केसांच्या मुळांशी लावून मसाज करावा. हे मिश्रण केसांमध्ये एक तास राहू देऊन मग शँपू ने केस धुवून टाकावेत. हा उपाय आठवड्यातून दोन वेळा केल्याने लवकरच केस गळती कमी होईल.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment