कपड्यांची निवड करताना या प्रकारची कापडे टाळा


कपडे खरेदी करताना आपण बहुतेक वेळी त्यांचे डिझाईन आणि किंमत या दोन गोष्टींचा प्रामुख्याने विचार करीत असतो. पण आपण निवड केलेला पेहराव कोणत्या प्रकारच्या कापडाने बनविला गेला आहे, या कडे आपण हवे तेवढे लक्ष देत नाही. आपण घेत असलेल्या पेहरावाचा कपडा आपल्या त्वचेला हानिकारक तर नाही, किंवा त्या कपड्यामुळे त्वचेवर लाली येणे, खाज सुटणे, लालसर चट्टे उठणे असे तर काही होत नाही ना, या गोष्टींचा विचार देखील आवर्जून करायला हवा. अनेकदा जर एखादा कपडा रंगविलेला, म्हणजेच ‘डाय ‘ केलेला असेल, तर या ‘ डाय ‘ मुळे ही त्वचेवर अॅलर्जी येऊ शकते. त्यामुळे पेहराव निवडताना तो कोणत्या प्रकारच्या कपड्याने बनविला गेला आहे, या कडे लक्ष देणे अगत्याचे ठरते.

पॉलियेस्टर हे कापड बनविताना त्यावर अनेक तऱ्हेच्या रासायनिक प्रक्रिया केल्या जातात. त्यामुळे शरीरातून निघणारा घाम हे कापड शोषून घेऊ शकत नाही. हा कपडा वारंवार वापरल्याने शरीरावर लालसर पुरळ उठणे, किंवा लाली पसरणे अश्या तक्रारी उद्भवितात. त्यामुळे ह्या सिंथेटिक कपड्याचा वारंवार वापर करणे टाळायला हवे. तसेच अॅक्रिलिक फायबर पासून बनलेले कापड पर्यावरणास हानिकारक अश्या प्रक्रियांपासून तयार करण्यात येते. एका ब्रिटीश जर्नल मध्ये प्रसिद्ध झालेल्या माहितीच्या अनुसार अॅक्रिलिक फायबर पासून तयार केलेला कपडा वारंवार वापरणाऱ्या महिलांना स्तनाचा कर्करोग होण्याची शक्यता असल्याचे म्हटले आहे.

रेयॉन हा कपडा, रेशमी कापडासारखा दिसणारा, पण त्यापेक्षा पुष्कळ स्वस्त असतो. लाकडाच्या पल्प पासून हे कापड तयार केले जाते. या कापडातून कार्बन डायसल्फाइड सारख्या घातक पदार्थांचे उत्सर्जन होते. त्यामुळे डोकेदुखी, उलट्या होणे, छातीत दुखणे, किंवा अंगदुखी अश्या अनेक तक्रारी उद्भवू शकतात. ज्या व्यक्ती ह्या कापडाचा अति वापर करतात, त्यांना पार्किंसन्स सारखे आजार होण्याची शक्यता असल्याचे वैज्ञानिकांचे म्हणणे आहे.

नायलॉनचा कपडा कॉस्टिक सोडा, सल्फ्युरिक अॅसिड, आणि मिथेन या रसायनांच्या प्रक्रिया करून बनविला जातो. ह्या रसायनांमुळे त्वचेवर अॅलर्जी येऊ शकते. अॅसिटेट फॅब्रिक लाकडाच्या पल्प मधून निघालेल्या सेल्युलोज पासून तयार करण्यात येते. हा कपडा तयार करण्याकरिता यावर अनेक तऱ्हेच्या रासायनिक प्रक्रिया केल्या जातात.

कापड खरेदी करताना नेहमी कॉटन, लिनेन, वुलन, किंवा रेशमी कापडाचा वापर करून बनविलेले पेहराव वापरावेत. सिंथेटिक कपडा वापरायचाच असेल, तर वापरण्यापूर्वी आणि वापरल्यानंतर स्वच्छ धुवावा. सिंथेटिक कापडाने बनलेला पोशाख न धुता अनेक वेळा घालू नये. त्यामुळे त्वचेवर रॅश येण्याची शक्यता असते.

Leave a Comment