तिशी नंतर ही तरुण दिसण्यासाठी…


जसजसे व्यक्तीचे वय वाढते, तसतसे त्या वाढत्या वयाच्या खुणा व्यक्तीच्या चेहऱ्यावर दिसू लागतात. चेहऱ्यावर सुरकुत्या, डाग, डोळ्यांच्या खाली काळी वर्तुळे येणे या मुळे चेहरा निस्तेज दिसू लागतो. अश्या वेळी त्वचेला जास्त काळजीपूर्वक जपण्याची आवश्यकता असते. पण पुष्कळदा आपल्या सततच्या धावपळीमुळे, वेळेच्या अभावी आपण आपल्या त्वचेची योग्य निगा राखू शकत नाही. अश्या वेळी काही सोप्या उपायांचा अवलंब केल्याने वाढत्या वयाच्या खुणा चेहेऱ्यावरून पुष्कळ प्रमाणात कमी होतील, व तिशी उलटून गेल्यानंतर ही तुम्ही तरुण दिसत राहाल.

वाढत्या वयाच्या खुणा सर्वप्रथम डोळ्यांच्या आसपास दिसून येऊ लागतात. डोळ्यांच्या आसपासच्या त्वचेवर अगदी बारीक सुरकुत्या येण्यास सुरुवात होते. अश्यावेळी उत्तम प्रतीच्या आय क्रीमचा वापर करणे आवश्यक असते. बाजारामध्ये अनेक उत्तम प्रतीची आय क्रीम्स उपलब्ध आहेत, त्यांच्या पैकी आपल्या त्वचेला सूट होईल असे आयक्रीम निवडावे. ह्या क्रीमच्या वापराने डोळ्यांच्या भोवतीच्या त्वचेला आर्द्रता मिळून डोळ्यांचा थकवा दूर होण्यास मदत मिळते.

हवामान थंड असो, वा उष्ण, आपल्या त्वचेची काळजी घेणे आवश्यक आहे. घराबाहेरील ऊन, धूळ यांच्यामुळे त्वचेचे नुकसान होत असते. त्यामुळे चेहऱ्यावर सुरकुत्या दिसून येऊ लागतात. त्यामुळे घराबाहेर पडण्यापूर्वी चेहरा, मान, हात या कपड्याने न झाकलेल्या भागांना एसपीएफ ३० असलेले सनस्क्रीन लावा. तसेच बाहेरून आल्यानंतर चेहरा, मान, हात एखाद्या सौम्य फेस वॉशने धुवून, त्यानंतर मॉईश्चरायजर लावा. घरामध्ये असताना देखील सनस्क्रीनचा वापर करा.

चेहऱ्यावर सुरकुत्या येण्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे त्वचेची आर्द्रता नाहीशी होणे, हे आहे. त्वचेची आर्द्रता नाहीशी झाल्याने त्वचा ताणल्यासारखी होऊन त्यावर सुरकुत्या येऊ लागतात. मॉईश्चरायजर च्या वापराने त्वचेला आर्द्रता मिळून त्वचा नरम, मुलायम राहते. तिशीनंतर क जीवनसत्व आणि बायो ऑइल्स युक्त मॉईश्चरायजर्सचा वापर करावा. यामुळे तुमची त्वचा सतेज आणि मुलायम दिसत राहील.

ज्या व्यक्ती चेहऱ्यावर सौंदर्य प्रसाधने किंवा कोणत्याही प्रकारचा मेकअप वापरत असतील, त्यांनी रात्री झोपण्यापूर्वी चेहऱ्यावरून मेकअप संपूर्णपणे काढून टाकावा. या करिता एखाद्या चांगल्या प्रतीच्या सौम्य फेस वॉशचा वापर करावा. चेहरा धुण्यासाठी गरम पाण्याचा वापर न करता, कोमट, किंवा थंड पाण्याचाच वापर करावा. त्यानंतर चेहऱ्यावर मॉईश्चरायजर लावावे. आठवड्यातून दोनदा चेहरा एखाद्या चांगल्या प्रतीच्या स्क्रब ने धुवावा. त्यामुळे त्वाचेवरील मृत पेशी निघून जाण्यास मदत मिळते.

तिशीनंतर आपली त्वचा सुंदर, नितळ दिसत राहावी, या करिता आहारावर नियंत्रण ठेवणे गरजचे आहे. आपल्या आहारामध्ये ओमेगा ३ व ६ फॅटी अॅसिड्स, व अँटी ऑक्सिडंट्स असलेले पदार्थ समाविष्ट करा. यामुळे आपली वाचा मुलायम व निरोगी बनेल. सुकामेवा, टोफू, मासे, अॅवोकाडो, सोयाबीन या पदार्थांमध्ये ओमेगा ३ व ६ फॅटी अॅसिड्स मोठ्या प्रमाणवर असतात. तसेच फळे, भाज्या यांमध्ये अँटी ऑक्सिडंट्स मोठ्या प्रमाणावर असतात. दिवसातून किमान आठ ग्लास पाणी प्यावे, त्यामुळेही त्वचा नितळ, सुंदर दिसत राहील.

Leave a Comment