मुंबई पोलिसांच्या शरीरावर लागणार कॅमेरे


फोटो सौजन्य मुंबई मिरर
देशाची आर्थिक राजधानी मुंबई मध्ये सध्या ५ हजार सीसीटीव्ही कॅमेरे कार्यरत असून आणखी २ हजार कॅमेरे बसविले जाणार आहेत. त्याचबरोबर ५०० मुंबई पोलिसांच्या शरीरावर बॉडी वोर्न कॅमेरे लावले जाणार आहेत. या शिवाय पोलिस वाहनांच्या समोरच्या काचेवर तसेच टपावर कॅमेरे बसविले जाणार आहेत. यामुळे कोणीही गुन्हेगार गुन्हा करून सुटू शकणार नाही. कारण पोलीस कॅमेऱ्यातून केले गेलेले शुटींग न्यायालयात त्याच्याविरोधातील पुरावा म्हणून वापरले जाणार आहे.

शहरात होणारी मोठी आंदोलने किंवा गस्त घालताना हे कॅमेरे उपयुक्त ठरणार आहेत कारण ते दिवसाप्रमाणे रात्रीच्या वेळीही शुटींग करू शकणार आहेत. त्याचबरोबर वायफाय, जीपीएस, ब्ल्यूटूथ सुविधेने हे कॅमेरे थेट पोलीस कंट्रोल रूमबरोबर जोडलेले असतील. पोलिसांवरील हल्ले, वाहतूक नियमांचे उल्लंघन करणारी वाहने यांचे चित्रण सुद्धा या कॅमेऱ्यात केले जाणार आहे.

पोलीसांच्या १०० वाहनांच्या समोरच्या काचेवर डॅश कॅमेरे बसविले जात असून त्यामुळे पळून जात असलेल्या आरोपींचे रेकॉर्डिंग करणे शक्य होणार आहे. पोलीस वाहनांवर हल्ले झाले तर त्याचे चित्रण छतावर बसविलेले कॅमेरे करू शकणार आहेत. तणावपूर्ण परिस्थितीत हे कॅमेरे त्या त्या ठिकाणांवर नजर ठेवतील. यामुळे कंट्रोल रूमला तेथील परिस्थितीची स्पष्ट कल्पना येणार आहे आणि जादा पोलीस कुमक आवश्यक वाटली तर ताबडतोब पाठविता येणार आहे.

Leave a Comment