वाराणसीत सुरु होणार रोपवे सेवा


फोटो सौजन्य मेट्रोरेल
पंतप्रधान मोदी यांच्या मतदारसंघात म्हणजे वाराणसी मध्ये रोपवे सार्वजनिक वाहतूक सेवा सुरु होत आहे. ही सेवा सुरु झाली की वाराणसी देशातील शहरी सार्वजनिक वाहतूक रोपवे सुरु करणारे देशातील पहिले शहर बनेल. या सेवेमुळे जुन्या काशी मधील गल्लीबोळ, अरुंद रस्ते वाहतूक कोंडीमुक्त होऊ शकणार आहेत. तसेच या सेवेमुळे विस्तारीत शहर आणि जुने शहर एकमेकांशी जोडले जाणार आहे.

शहर विकास मंत्रालयाने या संदर्भात वॅप्कॉस या रोपवे एक्स्पर्ट कंपनीशी करार केला असून या कंपनीने वाराणसीत सर्व्हेक्षण सुरु केले आहे. त्याचा अहवाल मार्च मध्ये सादर केला जात असून त्याला मंजुरी मिळाली की लगेच रोपवेचे काम सुरु होणार आहे. मोदींच्या या मतदारसंघाच्या दुसऱ्या कार्यकाळात वाराणसी विकासाच्या सर्व योजना त्यातही प्रथम वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यावर भर दिला जात आहे. वाराणसी साठी पूर्वी मेट्रोचा विचार केला गेला होता मात्र मेट्रोसाठी खर्च मोठा आहे शिवाय त्यात काही तांत्रिक अडचणी आहेत. यामुळे शहरात लाईट मेट्रो, गंगा फेरी सेवा, इलेक्ट्रिक बससह रोपवे सार्वजनिक वाहतुकीत सामील केला गेला आहे.

रोपवे मेट्रोपेक्षा खूप स्वस्त आहे. एक किमीचा मेट्रो मार्ग बनविण्यासाठी ३५० कोटी रुपये खर्च येतो तर याच मार्गासाठी रोपवेचा खर्च ५० ते ६० कोटी रुपये आहे.

Leave a Comment