करोना भीती, अँजेला यांचे हस्तांदोलन मंत्र्यांनी टाळले


फोटो सौजन्य भास्कर
जर्मनीत रविवारी झालेल्या उच्चस्तरीय मंत्री बैठकीत अचानक आलेल्या जर्मनीच्या चान्सलर अँजेला मर्केल यांनी इंटरनल अफेअर मिनिस्टर जोहोफर यांच्याशी हस्तांदोलन करण्यासाठी हात पुढे केल्यावर जोहाफार यांनी हस्तांदोलन टाळून फक्त हॅलो म्हटल्याचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. हा प्रसंग सर्वानी हसून साजरा केला असला तरी त्यामागे करोनाची लागण होण्याची भीती हेच कारण असल्याचे स्पष्ट झाले आहे.

चीनच्या वुहान मधून निघालेल्या करोना विषाणूने आता ७२ देशात हातपाय पसरले असून या विषाणूच्या संक्रमणापासून बचाव व्हावा म्हणून लोक एकमेकांना भेटणे सोडाच पण भेटले तरी हस्तांदोलन करण्यासही कचरत असल्याचे दिसून आले आहे. जर्मनीत १५० जणांना या विषाणूची लागण झाली आहे. मर्केल यांच्याशी हस्तांदोलन करण्याचे टाळल्यासंदर्भात मिडियाशी बोलताना जोहाफार यांनी चान्सलर मर्केल यांचीच प्रथम करोनापासून बचावासाठी हस्तांदोलन करणे बंद केल्याचा खुलासा केला आहे.

जोहाफार म्हणाले, मर्केल यांनी नुकताच त्याच्या मतदारसंघाचा दौरा केला तेव्हा त्यांनी तेथे कुणाशीही हस्तांदोलन केले नाही. त्या स्वतः करोना बाबत अतिशय जागरूक आहेत. यावर मर्केल यांनीही जोहाफार यांचा हस्तांदोलन न करण्याचा निर्णय योग्यच असल्याचे समर्थन केले आहे. जगभरात करोना बाधितांची संख्या ८७ हजारावर गेली आहे.

Leave a Comment