म्हणून साजरी करतात होळी


फोटो सौजन्य नईदुनिया
फाल्गुन महिन्यात वारे वाहू लागतात आणि हवा गरम होऊ लागते. हे दिवस म्हणजे थंडीला निरोप देण्याचे दिवस. यावेळी पलाश, सावरी सारखे वृक्ष फुलांनी लगडून जातात आणि गहू पिकून सोनेरी होतो. हा काळ म्हणजे निसर्गात सुरु होणारा रंगांचा उत्सवकाळ. अश्या वातावरणात येते होळी.

पौराणिक कथेनुसार हिरण्यकश्यपुने विष्णूला हरविण्यासाठी शिव, ब्रह्माची तपस्या करून वरदान मिळविले होते. त्यानुसार त्याला दिवसा रात्री, आकाश जमीन, शस्त्र, अस्त्र, माणूस आणि प्राणी, घरात बाहेर असा कुठेच मृत्यू येऊ शकणार नव्हता. त्यामुळे तो माजला होता आणि या वरदानाचा दुरुपयोग करून लोकांचा छळ करत होता. त्याने इंद्राचे राज्य बळकावले होते आणि त्रिलोकात तो उपद्रवी ठरला होता. त्याने विष्णूच्या पूजेवर बंदी घातली होती आणि विष्णूच्या ऐवजी त्याची पूजा करण्याचे आदेश सोडले होते.

हिरण्यकश्यपुचा मुलगा प्रल्हाद हा मोठा विष्णू भक्त होता. प्रल्हाद विष्णूची भक्ती सोडत नाही असे पहिल्यावर हिरण्यकश्यपुने त्याची बहिण होलिका हिला बोलावले. होलीकेकडे वरदान म्हणून मिळालेले एक वस्त्र होते त्यामुळे तिला अग्नीचे भय नव्हते. या वस्त्रामुळे अग्नी तिला जाळू शकत नव्हता. हिरण्यकश्यपुने होलीकेला प्रल्हादाला घेऊन चितेवर बसण्याचा आदेश दिला. त्याप्रमाणे होलीका प्रल्हादाला घेऊन होळीत बसली. प्रल्हादाचे रक्षण करण्यासाठी विष्णूने जोरदार वारे सोडले त्यामुळे होलीकेचे वस्त्र उडून प्रल्हादाच्या अंगावर पडले. त्याचा परिणाम म्हणजे प्रल्हाद आगीत सुखरूप राहिला पण होलिका जळून गेली.

फाल्गुन पौर्णिमेला होळी पेटविली जाते त्याअगोदर आठ दिवस होलीकाष्टक असते. या दिवसात शुभकार्ये करत नाहीत. केली तर त्यामुळे नुकसान होते असाही समज आहे. होलीकाष्टकच्या पहिल्याच दिवशी शिवाने मदनाचे भस्म केले होते असे मानतात. होळी हा वाईटावर चांगल्याचा विजय म्हणून साजरा केला जाणारा उत्सव असून होळीच्या दुसऱ्या दिवशी रंग खेळून हा उत्सव रंगतदार बनविला जातो.