8 मार्चलाच का साजरा केला जातो ‘आंतरराष्ट्रीय महिला दिन’ ?

दरवर्षी 8 मार्चला जगभरात अंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा केला जातो. यावर्षी देखील महिला दिन साजरा करण्यासाठी जोरात तयारी सुरू झाली आहे. मात्र तुम्हाला माहिती आहे दरवर्षी 8 मार्चलाच आंतरराष्ट्रीय महिला दिन का साजरा केला जातो ?

प्राचीन काळापासून ते आजपर्यंत भारतासह जगभरात महिला आपल्या अस्तित्वासाठी, हक्कासाठी लढत आलेल्या आहेत. आज या लढाईत महिलांना काही प्रमाणात यश आले आहे, मात्र आजही समानतेसाठी त्यांची लढाई सुरूच आहे. आपल्या हक्कासाठी ज्यावेळी महिला रस्त्यावर उतरल्या, तेव्हापासूनच या दिवसाची सुरूवात झाली.

महिला दिनाची सुरूवात मजूर आंदोलनापासून झाली आहे. वर्ष 1908 ला अमेरिकेतील न्यूयॉर्क शहरातील महिला स्वतःच्या हक्कासाठी रस्त्यावर उतरल्या होत्या. त्याच दिवसाला आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या रुपाने साजरे केले जाते. आपल्या नोकरीचे तास कमी करण्याच्या मागणी व्यतिरिक्त चांगले वेतन आणि मतदानाच्या अधिकारासाठी महिलांनी आवाज उठवला. त्यानंतर एक वर्षांनी अमेरिकेत पहिला राष्ट्रीय महिला दिन घोषित करण्यात आला.

वर्ष 1910 मध्ये कोपेनहेगन येथे महिलांच्या आंतरराष्ट्रीय परिषदे दरम्यान आंतरराष्ट्रीय महिला दिनाचा प्रस्ताव ठेवण्यात आला. त्यावेळी या परिषदेमध्ये 17 देशांपैकी 100 महिला उपस्थित होत्या. या सर्व महिलांनी याला पाठिंबा दिला. त्यानंतर वर्ष 2011 मध्ये ऑस्ट्रिया, डेनमार्क, जर्मनी आणि स्विर्झलँडमध्ये आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा करण्यात आला.

1975 मध्ये संयुक्त राष्ट्राने या दिवसाला अधिकृत मान्यता दिली. त्यावर्षीची थीम ‘सेलिब्रेटिंग द पास्ट, प्लॅनिंग फॉर द फ्यूचर’ अशी होती. तर या वर्षी थीम ‘I am Generation Equality: Realizing Women’s Rights’, अशी आहे.

1917 मध्ये युद्धादरम्यान रशियाच्या महिलांनी ब्रेड अँड पीसची मागणी केली. महिलांच्या या आंदोलनामुळे तेथील सम्राटाला पद सोडावे लागले. सोबतच सरकारने महिलांना मतदानाचा हक्क देखील दिला. त्यावेळी ज्युलियन कँलेडरचा उपयोग होत असे. ज्या दिवशी हा संप सुरू झाला तो दिवस 23 फेब्रुवारी होता. तर ग्रेग्रोरियन कॅलेंडरमध्ये तो दिवस 8 मार्च होता. तेव्हापासूनच या दिवसाला आंतरराष्ट्रीय महिला दिन म्हणून घोषित करण्यात आले.

विविध देशात हा दिवस वेगवेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो. अनेक ठिकाणी या दिवशी राष्ट्रीय सुट्टी असते, तर काही ठिकाणी महिलांना फुल दिले जाते.

Leave a Comment