सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली पवन गुप्ताची विनंती याचिका


नवी दिल्ली – सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी निर्भया सामुहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणातील चौथा आरोपी पवन गुप्ताची विनंती याचिका फेटाळली. त्याने ही विनंती याचिका आपली फाशीची शिक्षा जन्मठेपेत रुपांतरीत करावी यासाठी दाखल केली होती. त्याचबरोबर न्यायालयाने उद्या त्याच्या नावे काढण्यात आलेल्या डेथ वॉरंटलाही स्थगिती देण्यास नकार दिला आहे.

आपल्या याचिकेत पवनने म्हटले होते की, ज्यावेळी ही घटना घडली त्यावेळी आपण अल्पवयीन होता. त्याची याप्रकरणी पुनर्विचार याचिका यापूर्वीच फेटाळण्यात आली आहे. पवनची याचिका ५ न्यायाधीशांच्या खंडपीठाने सर्वसंमंतीने फेटाळली आहे. दरम्यान, पवनकडे अद्याप राष्ट्रपतींकडे दया याचिका दाखल करण्याचा पर्याय उपलब्ध आहे. तसेच दुसरीकडे अन्य दोषी अक्षय सिंह याने देखील शनिवारी राष्ट्रपतींसमोर पुन्हा एकदा दया याचिका दाखल केली. कनिष्ठ न्यायालयाने १७ फेब्रुवारी रोजी या प्रकरणातील चारही दोषींच्या नावे डेथ वॉरंट जारी करत ३ मार्च रोजी सकाळी ६ वाजता फाशीची तारीख निश्चित केली होती.

Leave a Comment