विराट सेनेचा पराभव करत न्यूझीलंडने जिंकली कसोटी मालिका


ख्राईस्टचर्च – भारतीय फलंदाजांनी पत्करलेल्या हाराकिरीमुळे न्यूझीलंडविरूद्धची दुसरी कसोटी विराट सेनेने गमावली आहे. भारताच्या १३२ धावांचा पाठलाग तिसऱ्या दिवशी न्यूझीलंडने सात गडी राखून केला. न्यूझीलंडकडून दुसऱ्या डावात टॉम लॅथमने ५२ तर, टॉम ब्लंडेलने ५५ धावा करत हा विजय नोंदवला आहे. भारताच्या पहिल्या डावाला खिंडार पाडणारा गोलंदाज काईल जेमिसनला सामनावीर पुरस्कार देण्यात आला.

तिसऱ्या दिवशी भारताने ६ बाद ९० धावांवरुन पुढे खेळण्यास सुरुवात केली. तेव्हा भारताचे शेवटचे चार फलंदाज अवघ्या ३४ धावांमध्ये माघारी परतले. हनुमा विहारी (९) टीम साऊदीच्या गोलंदाजीवर माघारी परतला. त्याचा झेल वॉटलिंगने टिपला. यानंतर ऋषभ पंत (४), मोहम्मद शमी (५) एकामागोमाग परतले. तेव्हा रवींद्र जडेजाने भारताला शतकी आघाडी मिळवून दिली.

ट्रेंट बोल्टच्या गोलंदाजीवर चोरटी धाव घेण्याच्या प्रयत्नात जसप्रीत बुमराह धावबाद झाला आणि भारताचा दुसरा डाव १२४ धावांमध्ये आटोपला. रवींद्र जडेजा १६ धावांवर नाबाद राहिला. न्यूझीलंडकडून दुसऱ्या डावात ट्रेंट बोल्टने सर्वाधिक ४ गडी टिपले. त्याला टीम साऊदीने ३ तर डी ग्रँडहोम आणि वँगर यांनी प्रत्येकी १-१ गडी बाद करत चांगली साथ दिली.

Leave a Comment