लेक कॅन्डी, रहस्यमयी सरोवर


फोटो सौजन्य क्युरिओसिटी
कझाकिस्तान हा निसर्गसुंदर देश पर्यटकांचे मोठे आकर्षण ठरतो आहे. जगभरात सर्वत्र डोंगर दऱ्या, नद्या सरोवरे, जंगले आढळतात. पण सरोवर आणि जंगल एकातएक असल्याचे दृश्य फक्त कझाकिस्तान मध्ये पाहायला मिळते. येथील लेक सरोवर त्यामुळेच रहस्यमयी मानले जाते. या शांत आणि सुंदर सरोवरात अख्खे जंगल सामावले आहे. विविध प्रकारचे महाप्रचंड वृक्ष या सरोवरात बुडाले आहेत आणि त्यातील अनेक वृक्षांना पाण्यातही नवीन फांद्या फुटताना दिसतात.


असे सांगतात की १९११ मध्ये येथे मोठा भूकंप झाला आणि त्यात डोंगराचा मोठा भाग कोसळला. झाडे पडल्याने त्याचा एक बांध तयार झाला. वर्षानुवर्षे पावसाचे पाणी त्यात साठत राहिले आणि हे सुंदर सरोवर निर्माण झाले. समुद्रसपाटीपासून २ हजार फुटावर हे सरोवर आहे. सरोवर खूप मोठे नाही. साधारण ४०० मिटर लांबीचे आहे. वर्षानुवर्षे पाण्यात राहिल्याने काही झाडे मृत झाली आहेत पण पाण्याच्यावर अजूनही त्याची मोठाली खोडे दिसतात. या सरोवरातील पाण्याचे तापमान ऐन उन्हाळ्यात सुद्धा ६ डिग्री असते. सरोवराचे पाणी अतिशय शांत आणि स्वच्छ आहे. त्यामुळे गोठविणाऱ्या पाण्यात न उतरताही आतील जंगल स्पष्ट दिसू शकते.

धुके दाटले असेल तर या परिसराला आणखीन गुढ स्वरूप येते. या परिस्थितीत सरोवर अधिक रोमांचक भासते. थंडीत ते गोठते त्याकाळात येथे मासेमारी आणि आईस डायविंगसाठी गर्दी होते.

Leave a Comment