भक्त प्रल्हादाने बांधले होते हे नरसिंह मंदिर


फोटो सौजन्य पत्रिका
भगवान विष्णूचे जे दहा अवतार मानले जातात, त्यातला पाचवा अवतार म्हणजे नरसिंह. हिरण्यकश्यपु राजाच्या छळातून भक्त प्रल्हादाचे रक्षण करण्यासाठी विष्णूचा हा अवतार होता. नरसिंह जेथे प्रकट झाला ते स्थान सिंहाचल पर्वतावर होते असे मानले जाते. येथेच भक्त प्रल्हादाने नरसिंहाचे मंदिर उभारले होते त्याला सिंहाचलम नरसिंह मंदिर या नावाने ओळखले जाते. विशेष म्हणजे नरसिंह हा उग्र अवतार आहे. पण या मंदिरात तो लक्ष्मी सह विराजमान आहे.

या मूर्तीला वर्षभर चंदनाचा लेप लावलेला असतो आणि वर्षातून एकदा अक्षयतृतीयेदिवशी हा लेप काढला जातो त्यामुळे फक्त या एकाच दिवशी प्रत्यक्ष मूर्तीचे दर्शन भाविकांना होते. त्यामुळे या दिवशी येथे मोठा उत्सव साजरा केला जातो. ११ व्या शतकातील हे प्राचीन मंदिर भारतातले पहिले नरसिंह मंदिर असल्याचे सांगितले जाते.


कथा अशी आहे की जेव्हा हिरण्यकश्यपुने मुलगा प्रल्हाद याला नारायणाचे नाव घेऊ नये अशी बंदी केली होती मात्र प्रल्हाद सतत नारायण नारायण असा जप करत होता. विष्णूचे नाव घेत राहिल्याने हिरण्यकश्यपु त्याचा छळ करत असे तेव्हा प्रल्हादाने प्रार्थना केल्यावर खांबातून नरसिंह प्रकटला आणि त्याने हिरण्यकश्यपुचा वध केला. त्यावेळी नरसिंह खूप क्रोधात होता त्यामुळे नंतर त्यांच्या अंगाची आग होऊ लागली. त्याला थंड वाटावे म्हणून चंदन लेप केला गेला आणि त्यामुळे त्याचे शरीर आणि क्रोध दोन्ही शांत झाले.

हे मंदिर कालांतराने जमिनीत गाडले गेले होते. पुरुरवा राजाने ते पुन्हा खणून काढले आणि मूर्तीची पुनर्स्थापना केली. तेव्हाही मूर्तीला चंदन लेप लावण्याची प्रथा सुरूच राहिली. अक्षयतृतीयेला या मंदिरात प्रचंड गर्दी होते आणि इतरवेळी वर्षभरही भाविक येथे दर्शनासाठी येत असतात. हे मंदिर एका पहाडावर असून विशाखापट्टणम पासून १६ किमीवर आहे.

Leave a Comment