कोरोनाचा सर्वाधिक धोका या वयोगटाला


फोटो सौजन्य इकोनोमिक टाईम्स
चीनच्या वुहान मधून जगभर आपले पाय पसरत चाललेल्या करोना विषाणूबाबत एक नवीन शोध लागला असून या विषाणू संसर्गाचा सर्वाधिक धोका वयाने ६० च्या पुढच्या वयोगटाला असल्याचे एका पाहणीत दिसून आले आहे. चीनच्या सीडीसी विकली मध्ये हा अहवाल प्रकाशित करण्यात आला आहे. त्यानुसार फेब्रुवारीच्या पहिल्या पंधरा दिवसात चीन मध्ये ७० हजार रुग्णांचे सर्व्हेक्षण केले गेले त्यात पूर्वी हृदयाचे अथवा रक्तदाबाचे दुखणे असलेल्या वयस्कर लोकांचे प्रमाण लागण झालेल्या रुग्णात सर्वाधिक असल्याचे दिसून आले आहे.

जागतिक आरोग्य संघटनेने करोनाची लागण कुणाला होण्याचा धोका आहे आणि त्यातही अधिक संवेदनशील वयोगट कोणता यासाठी पाहणी सुरु केली होती. सध्या करोनाचा प्रसार जगातील ६१ देशात झाला असून ८६ हजार लोकांना त्याची लागण झाली आहे. या विषाणूमुळे मृत्यू पावलेल्यांची संख्या ३ हजारावर गेली आहे. चीन मध्ये लागण झालेल्या ४४,७०० मध्ये ८० टक्के लोक ६० पेक्षा जास्त वयाचे आहेत आणि बाकी ७० च्या पुढचे आहेत. अन्य देशातही हाच ट्रेंड दिसून आला आहे.

त्यापाठोपाठ हृदयचे दुखणे आणि रक्तदाबाचा त्रास असलेल्या ज्या करोना रुग्णांवर डॉक्टर व अन्य वैद्यकीय स्टाफ ऊपचार करत आहेत त्या डॉक्टर आणि स्टाफमध्येही करोनाची लागण होण्याचे प्रमाण मोठे आहे. विशेष म्हणजे करोनाचा मुख्य हल्ला फुफुसांवर होतो आणि लहान मुलांना फुफुसाना संसर्ग होण्याचा धोका सर्वाधिक असतो तरीही करोनाची फारशी लागण लहान मुलांना झालेली नाही. १० ते १९ वयोगटातील १ टक्के मुलांना त्याची लागण झाली आहे मात्र १० पेक्षा कमी वयाच्या मुलांत हे प्रमाण १ टक्क्याहूनही कमी आहे. विशेष म्हणजे करोनाला एकही लहान मूल बळी पडलेले नाही असेही दिसून आले आहे.

Leave a Comment