मेकअपमधील या चुकांमुळे तुम्ही दिसू शकता जास्त वयस्क


मेकअप किंवा आपण वापरत असलेली सौंदर्य प्रसाधने आपले सौंदर्य वाढविण्यास मदत करतात. योग्य तऱ्हेची प्रसाधने वापरून केला गेलेला मेकअप तुमचे व्यक्तिमत्वच पालटून टाकतो. पण मेकअप करताना योग्य काळजी घेतली नाही, तर याच मेकअप मुळे तुम्ही सुंदर, तरुण दिसण्याऐवजी जास्त वयस्क दिसू शकता. त्यामुळे कोणत्याही प्रसाधनाचा उपयोग करण्यापूर्वी त्या प्रसाधनाची संपूर्ण माहिती तुम्हाला असणे आवश्यक आहे. तसेच मेकअप करताना तुम्ही तुमचा स्कीन टोन देखील अवश्य विचारात घ्यायला हवा. जर या गोष्टींची काळजी घेतली नाही, तर आपल्या मेकअपने आपल्याला मनासारखा लुक मिळणे अवघड होईल.

डोळ्यांना हायलाईट करण्यासाठी आयलायनर वापरला जातो. पण ह्या प्रसाधनाचा वापर केवळ काही खास प्रसंगांपुरताच मर्यादित ठेवावा. आयलायनर अति प्रमाणात वापरल्याने पापण्यांची त्वचा सैल पडू लागते, व त्यावर सुरकुत्या येऊ लागतात. त्यामुळे तुम्ही अकाली वयस्क दिसू लागता.

चेहऱ्यावरील डाग लपविण्यासाठी ‘ कन्सिलर ‘ वापरण्यात येतो. पण कन्सिलर निवडताना महिला आपल्याला हव्या त्या शेडचा कन्सिलर निवडताना दिसतात. असे न करता आपल्या त्वचेच्या टोन प्रमाणे कन्सिलर निवडणे चांगले. या करिता कन्सिलर आधी आपल्या चेहऱ्यावर लावून पाहावा, जर त्याची शेड तुमच्या स्कीन टोनशी जुळणारी असेल, तरच त्या कन्सिलरची निवड करावी. चुकीच्या शेडचा कन्सिलर वापरल्याने चेहऱ्या वरील डाग जास्त हायलाईट होण्याचा संभव असतो.

बहुतांशी मुलींना आजकाल लांब केस ठेवणे आवडू लागले आहे. त्यामुळे केस लांब असले म्हणजे झाले, त्याला शेप देण्याची आवश्यकता नाही, अशी ही मुलींची समजूत असते. पण असे न करता, लांब केसांचे देखील अधूनमधून जरासे ट्रीमिंग करून त्यांना व्यवस्थित शेप देणे गरजेचे असते. त्याचबरोबर केस कुठल्या पद्धतीने बांधले की चांगले दिसतील, किंवा केसांचा भांग कसा पडला म्हणजे चांगले दिसेल, याचा ही विचार मुलींनी अवश्य करावा. आपल्या चेहऱ्याला साजेशी नसणारी हेअरस्टाईल केल्याने तुम्ही अकाली वयस्क दिसू शकता.

पूर्वीच्या काळी लिप लायनर लावून मग लिपस्टिक लावायची अशी मेकअप ट्रेंड होती. पण आता लिप लायनर ला अजिबात फाटा देऊन केवळ लिपस्टिकचा वापर करण्याची ट्रेंड आहे. त्यामुळे सध्याच्या ट्रेंड नुसार मेकअप करायचा असेल, तर लिप लायनरचा वापर टाळा. तसेच ब्लश वापरताना आपल्या चेहऱ्याचा स्कीन टोन आणि ब्लशची शेड यांचा काळजीपूर्वक विचार करावा. ब्लश लावताना चेहऱ्यावर योग्य ठिकाणी लावा. स्मितहास्य केल्यानंतर आपली चीक बोन्स जिथे येतील, त्या ठिकाणी ब्लश लावायला हवा.

Leave a Comment