गंगाजल कधीही अशुद्ध न होण्यामागील रहस्य वैद्यानिकांना उलगडले


गंगाजल, म्हणजेच गंगा नदीचे पाणी कधीही अशुद्ध होत नाही, किंवा त्यामध्ये कधीही कोणत्याही घातक जीवाणूंचा प्रादुर्भाव होत नाही अशी मान्यता आहे. पण आज गंगेची अवस्था मनुष्याने हालाखीची करून टाकली आहे. कधी तिच्या पाण्यामध्ये घातक रसायने सोडून दिली, तर कधी प्रेते वाहवली. कधी नाल्यांचे पाणी नदीत येऊन मिसळले, तर कधी घाटावरील असंख्य पूजांचे निर्माल्य आणि बाकीचा केरकचरा नदीमध्ये फेकला गेला. पण इतके सगळे सामावून घेऊनही गंगा शुध्द राहिली. हा चमत्कार नेमका कसा घडला याचे रहस्य वैज्ञानिकांना आता उलगडले आहे.

वैज्ञानिकांनी केलेल्या एका रिसर्चनुसार गंगेच्या पाण्यामध्ये असलेल्या एका व्हायरसमुळे नदीचे पाणी कधीही अशुद्ध होत नाही. या व्हायरस मुळे नदीच्या पाण्यामध्ये इतर कोणतेही घातक कीटाणू उद्भवू शकत नाहीत, किंवा पाण्याला कोणत्याही प्रकारची दुर्गंधीदेखील येत नाही. गंगेचे पाणी कैक दिवस साठवून ठेवल्याने देखील या पाण्याला कोणत्याही प्रकारची दुर्गंधी येत नाही. यासंबंधी केल्या गेलेल्या शोधानंतर एक रोचक तथ्य वैज्ञानिकांच्या समोर आले.

ही गोष्ट आहे १८९० सालची. या दरम्यान अर्नेस्ट हँकिन नावाचे ब्रिटीश शास्त्रज्ञ गंगेच्या पाण्यावर रिसर्च करीत होते. त्याकाळी कॉलरा या रोगाची भयंकर साथ पसरलेली होती. कॉलरा झालेले अनेक रुग्ण दररोज मृत्युमुखी पडत होते. त्यांची शवे, त्यांचे परिजन गंगेच्या पाण्यामध्ये वाहवीत असत. त्यामुळे या पाण्यामध्ये नियमित स्नानासाठी येणाऱ्या लोकांनादेखील कॉलराची बाधा होईल अशी चिंता हँकिन यांना अस्वस्थ करू लागली. त्याच दृष्टीने पाण्यामध्ये कॉलराचे जीवाणू पाण्यामध्ये सापडतात किंवा नाही, याचा शोध जेव्हा हँकिन यांनी घेतला, तेव्हा त्यांच्या आश्चर्याला पारावार उरला नाही. कॉलराने मृत्युमुखी पडलेल्या इतक्या लोकांची प्रेते गंगेच्या पाण्यामध्ये वाहवूनही गंगेचे पाणी अजिबात अशुद्ध झालेले नव्हते. त्यामुळे गंगेचे पाणी प्यायल्याने किंवा त्यामध्ये स्नान केल्याने लोकांना देखील कॉलराची बाधा होईल ही हँकिन यांची भीती फोल ठरली.

हँकिन यांच्या रिसर्चवर, वीस वर्षांनी एका फ्रेंच वैज्ञानिकाने काम करण्यास सुरुवात केली. या रिसर्च मध्ये या वैज्ञानिकाला असे आढळून आले की, गंगा नदीच्या पाण्यामध्ये असलेला एक विशिष्ट व्हायरस पाण्यामधील इतर घातक जीवाणूंचा प्रादुर्भाव रोखतो. हा व्हायरस घातक जीवाणूंचा अंत करीत असल्याने ह्याला ‘ निन्जा व्हायरस ‘ असे नाव दिले गेले आहे. सध्याच्या आधुनिक वैज्ञानिक युगातही हा व्हायरस याच नावाने ओळखला जातो. या व्हायरस मुळे गंगेचे पाणी आजवर कधीही अशुद्ध झालेले नाही. कर्करोगासारख्या भयानक रोगाच्या जीवाणूंचा अंत करण्यास निन्जा व्हायरस उपयोगी पडू शकतो किंवा नाही, याचा शोध सध्या वैज्ञानिक घेत आहेत.

सध्या कोणत्याही आजारासाठी रुग्णाला अँटी बायोटिक्स दिली जातात, पण वैज्ञानिकांच्या म्हणण्यानुसार आणखी तीस वर्षांनी कोणतीही अँटी बायोटिक्स फार प्रभावी राहणार नाहीत. अश्या वेळी निरनिराळे रोग बरे करू शकण्याची क्षमता असणारे एक तरी औषध तयार केले जाणे आवश्यक आहे. निन्जा व्हायरस त्या कामी उपयोगी पडू शकतो किंवा नाही या दृष्टीने वैज्ञानिक आता रिसर्च करीत आहेत.

Leave a Comment