शाही परिवारातील सदस्यांच्या खानपानातील आवडीनिवडी


डॅरेन मॅकग्रेडी १९८२ ते १९९७ या काळामध्ये ब्रिटनच्या शाही परिवाराचे खासगी हेड शेफ म्हणून कार्यरत होते. त्यांनी शाही परिवारातील काही खास सदस्यांच्या आवडीनिवडींबद्दल सांगितले आहे. जगातील या अतिशय प्रभावशाली परिवाराच्या खानपानाच्या आवडी निवडी सांभाळणे हे अतिशय जोखमीचे काम आहे, कारण प्रत्येक सदस्याच्या खाण्यापिण्याच्या विशिष्ट सवयी आहेत. तसेच हे सदस्य आपल्या आहाराच्या बाबतीत अतिशय काटेकोर आहेत. आपल्या आहारनियमांच्या चौकटीच्या बाहेर पडण्यास हे लोक अजिबात राजी नसतात. आणि म्हणूनच की काय, राणी एलिझाबेथला आज वयाच्या ९१व्या वर्षी देखील उत्तम प्रकृतीचे वरदान लाभले आहे.

ब्रिटनच्या राजपरिवाराची भेट घेण्यास कायम देश-विदेशामधून अनेक राजकीय नेते, सामाजिक कार्यकर्ते, अनेक देशांचे राष्ट्राध्यक्ष येत असतात. त्यांच्या सन्मानाच्या प्रीत्यर्थ मेजवान्या देखील होत असतात. त्या मेजवान्यांमध्ये तयार केले जाणारे सर्व पदार्थ राणी एलिझाबेथच्या पूर्वसंमतीनेच तयार केले जातात. पण राणी एलिझाबेथ देखील आपल्या खासगी आयुष्यामध्ये खाण्यापिण्याच्या बाबतीत अतिशय काटेकोर आहे. बहुतांश वेळी, दुपारच्या जेवणासाठी राणी एलिझाबेथ ग्रिल्ड फिश आणि वाफाविलेल्या भाज्या खाणे पसंत करते, तर सकाळी नाश्त्यासाठी कॉर्न फ्लेक्स आणि दूध हा साधा मेन्यू राणीच्या पसंतीचा आहे. मात्र कर्बोदके अधिक प्रमाणात असलेले अन्नपदार्थ मात्र राणी एलिझाबेथ अगदी आवर्जून टाळते.

राणी एलिझाबेथचे यजमान प्रिन्स फिलीप हे ही ‘ हेल्दी इटिंग ‘ चे पुरस्कर्ते आहेत. तसेच युवराज चार्ल्स हे देखील आपल्या आहारामध्ये केवळ जैविक ( organic ) अन्नपदार्थांच्या समावेशाबद्दल आग्रही असतात. राजपरिवारातील सर्वच सदस्य खाण्यापिण्याच्या बाबतीत अतिशय चोखंदळ असले, तरी त्यांची ही एक कमजोरी आहे.. ती म्हणजे चॉकलेट. राणी एलिझाबेथला देखील चॉकलेट अतिशय प्रिय आहे, त्यामुळे राणी घेत असलेल्या दुपारच्या चहाबरोबर चॉकलेट केक असणे हा अलिखित नियमच आहे. तसेह रात्रीच्या जेवणानंतर राणी एलिझाबेथ एक ग्लास उत्तम प्रतीच्या शँपेनचे सेवन आवर्जून करते. ते सोडून इतर वेळी मद्यपान करताना राणी क्वचितच आढळते.

राजघराण्याचे दोन तरुण राजकुमार म्हणजे प्रिन्स विलियम आणि प्रिन्स हॅरी यांना देखील गोडाची अतिशय आवड असल्याचे मॅकग्रेडी म्हणतात. विलियम आणि हॅरी लहान असताना पिनट बटर आणि जेली मफिन्स हे त्यांचे आवडते खाद्यपदार्थ होते. विलियम ने आपल्या विवाहाच्या प्रसंगी आयोजिलेल्या स्वागत समारंभासाठी देखील चॉकलेट फज आणि बिस्कीट केक असे गोड पदार्थ निवडले होते. दोघा राजकुमारांना पारंपारिक अन्नपदार्थांची देखील आवड आहे. त्यामध्ये कॉटेज पाय, फिश केक्स, आणि चिकन हे पदार्थ त्याच्या खास आवडीचे आहेत, असे मॅकग्रेडी म्हणतात. या दोघांची आई, प्रिन्सेस ऑफ वेल्स- लेडी डायना ही देखील आपल्या आहाराच्या बाबतीत अतिशय चोखंदळ होती.

Leave a Comment