…म्हणून खावी चटणी


आपल्या खाद्यसंस्कृतीमध्ये असे अनेक पदार्थ आहेत, ज्यांच्या शिवाय आपले भोजन पूर्ण होत नाही. या पदार्थांमुळे भोजनाचा स्वाद अजूनच वाढतो. हे पदार्थ म्हणजे कोशिंबीर, लोणचे, पापड आणि चटणी. या पदार्थांपैकी चटणी असा पदार्थ आहे, जो तुम्ही जेवताना तर खाताच, पण हा पदार्थ सकाळच्या नाश्त्याच्या जोडीने किंवा मधल्या वेळेच्या हलक्या फुलक्या स्नॅक्ससोबतही खाऊ शकता. चटणी हा पदार्थ इतका चविष्ट असतो, की अगदी साध्या भोजनाचा देखील स्वाद वाढवितो. पण चटणी या पदार्थाने केवळ भोजनाचा स्वादच नाही, तर आरोग्य चांगले राहण्यासही मदत होते. निरनिराळ्या पदार्थांपासून तयार करण्यात आलेल्या चटण्या आपल्या शरीरासाठी निरनिराळ्या प्रकारे गुणकारी आहेत.

आवळ्याच्या चटणीच्या सेवनाने शरीराची रोगप्रतिकारशक्ती चांगली राहते. आवळ्यामध्ये असलेले क जीवनसत्व आणि इतर पौष्टिक तत्व आपल्या शरीराला लहान-सहान आजारांपासून संरक्षण देतात. त्याचबरोबर या चटणीमध्ये आवळ्यांच्या जोडीने आले आणि लिंबू मिसळल्यास शरीराला अँटी ऑक्सिडंट्स ही मिळतात.

कोथिंबीरीचा प्रामुख्याने वापर करून बनविण्यात आलेल्या चटणी मध्येही क जीवनसत्व मोठ्या प्रमाणावर असते. ह्या चटणीच्या नियमित सेवनाने डायबेटीस सारखे रोग नियंत्रणात राहतात. तसेच पुदिन्याच्या चटणीमध्ये अँटी बॅक्टेरियल गुण असतात. पुदिना हा पाचनक्रियेसाठी उत्तम असल्याने बद्धकोष्ठ असणाऱ्या व्यक्तींकरिता पुदिन्याची चटणी अतिशय गुणकारी आहे. कोथिंबीरीसोबत आले आणि लसूण वापरून तयार केलेल्या चटणीमळे अन्नाचे पचन चांगले राहते, तसेच आतड्यांच्या आरोग्याकरिता ही चटणी चांगली आहे.

टोमॅटोच्या चटणी मध्ये क जीवनसत्व, लायकोपीन, पोटॅशियम इत्यादी पोषक तत्वे मुबलक मात्रेमध्ये असून यामध्ये कोलेस्टेरोल कमी करणारे गुण आहेत. त्यामुळे हृदयाच्या आरोग्याच्या दृष्टीने ह्या चटणीचे सेवन चांगले आहे. त्याचबरोबर ज्या व्यक्तींना आपले वजन घटवायचे आहे, त्यांच्यासाठी देखील या चटणीचे सेवन फायदेशीर आहे.

कांदे आणि लसूण वापरून तयार केलेली चटणी नैसर्गिक अँटी बायोटिकचे काम करते. लसूण अँटी बॅक्टेरियल आणि अँटी फंगल आहे. आपल्या आहारामध्ये लसूण अवश्य समाविष्ट केलेली असावी. याच्या सेवनाने त्वचेवर दिसू लागलेल्या प्रौढत्वाच्या खुणा कमी होऊन, त्वचा सुंदर आणि तरुण दिसू लागते.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment