पत्नीच्या प्रेमाखातर त्याने बांधल्या चक्क सहा हजार पायऱ्या


दशरथ मांझीने आपल्या लाडक्‍या पत्नीचा जीव घेणाऱ्या डोंगराला फोडण्याची जिद्द प्रत्यक्षात उतरवून दाखवली. त्यांनी २२ वर्षांच्या मेहनतीनंतर ३६० फूट लांब, २५ फूट खोल आणि ३० फूट रुंद रस्ता बांधला. आता साऱ्या जगाला ही निखळ प्रेमाची आणि जिद्दीची कहाणी माहिती झाली. आता अशाच एका पत्नी प्रति असलेल्या प्रेमाचे दर्शन घडवणारी एक कहाणी नव्याने समोर आली आहे.

आपल्या प्रेमविवाहाला काही वर्षांपूर्वी लोकांचा तीव्र विरोध केल्याने जू चाओकिंग पळून गेले होते. जंगलातील गुहेत त्यांनी लोकांपासून दूर आपला संसार थाटला होता. ते गुहेत आपल्या मुलांसोबत सुखाने संसार करत होते. कोणालाही त्यांच्या या नव्या विश्वाबद्दल माहिती नव्हती. पण जेव्हा जंगलातून तब्बल ५० वर्षांनी काही ट्रेकर्सने गुहेत जाणाऱ्या हजारो पायऱ्या पाहिल्या तेव्हा ही प्रेमकहाणी जगासमोर आली. या पायऱ्या आता प्रेमाचे प्रतीक बनले आहे.

गावाला जू चाओकिंग आणि लियू गुओजियाद यांचा विवाह मान्य नव्हता, कारण लियू ही विधवा होती. दोन मुलेही तिच्या पदरी होती. गावकऱ्यांना एका विधवेने पुन्हा संसार थाटावा हे मान्य नव्हते. गावकऱ्यांचा म्हणून तीव्र विरोध होऊ लागल्यावर जू आणि लियू हे दोघेही गावातून पळून गेले. त्यांनी आपला संसार जंगलातील एका गुहेत थाटला. कोणीही येथे आपल्याला त्रास देणार नाही हे त्यांना माहिती होते.

जू आणि लियूचे प्रेम कोणत्याही सोयी सुविधेविना फुलू लागले होते. येथे गावकऱ्यांचा विरोध नसला तरी तेथे राहताना जू यांच्या आपल्या पत्नीला एक मोठी अडचण येत असल्याचे लक्षात आले. गुहेतून खाली उतरण्याची वाट निसरडी होती. डोंगर असल्याने कधीही आपल्या पत्नीचा त्यावरून पाय घसरून जीव जाऊ शकतो ही भीती जू यांना वाटत होती. त्यांनी त्याच क्षणापासून डोंगर पोखरून पायऱ्या बांधायला सुरूवात केली. त्यांनी एक-एक पायरी करत ५० वर्षांत सहा हजार पायऱ्या बांधल्या.

Leave a Comment