दैनिक सामनाच्या संपादकपदी रश्मी ठाकरे


मुंबई : राज्याच्या मुख्यमंत्री पदी विराजमान झाल्यानंतर संपादक पदी राहण्यात अडचणी येण्याच्या शक्यता लक्षात घेऊन शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनाचे संपादक पद आजपासून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्याकडे सोपविण्यात आले आहे. आजपासून सामनाच्या प्रेसलाईनमध्ये संपादक म्हणून सौ. ठाकरे यांच्या नावाची नोंद करण्यात आली आहे.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी २३ जानेवारी १९८९ रोजी सामना हे मुखपत्र सुरु केले. त्यांच्या निधनानंतर सामनाच्या संपादकपदाची जबाबदारी उद्धव ठाकरे यांच्याकडे सोपवण्यात आली. रश्मी ठाकरे या सामना वृत्तपत्र सुरु झाल्यापासून तिसऱ्या संपादक बनल्या आहेत. सामनाच्या कार्यकारी संपादकपदी शिवसेना नेते आणि राज्यसभा खासदार संजय राऊत हे कायम आहेत.

राज्यात महाविकास आघाडी स्थापन झाल्यानंतर उद्धव ठाकरे राज्याचे मुख्यमंत्री झाल्यामुळे आता पक्षाच्या मुखपत्राचे संपादक म्हणून राहणे त्यांना अडचणीचे ठरु शकते, हे लक्षात घेऊन संपादक पदात बदल करण्यात आला आहे.

Leave a Comment