इंदुरीकरांच्या वादग्रस्त प्रवचनामुळे बदनाम होत आहे वारकरी संप्रदाय – श्याम मानव


नागपूर – अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष श्याम मानव यांनी एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीतत वारकरी संप्रदायाचे कीर्तनकार इंदुरीकर महाराजांच्या वादग्रस्त प्रवचनामुळे नुकसान होत असून लिंग निवडीबद्दल त्यांनी मांडलेला सम-विषम फॉर्म्युला कायद्याने गुन्हा ठरत असल्याचा आरोप केला आहे. संत तुकोबा, ज्ञानोबा यांच्या विचारांमध्ये वैधानिक दृष्टीकोन होता मग त्यांच्या नावाने इंदुरीकर महाराजांनी कीर्तनाची परंपरा धुळीस मिळवण्याचा कुणालाही अधिकार मिळत नसल्याची टीका देखील त्यांनी केली आहे.

संतती प्राप्त होण्यासाठी सम-विषमचा फॉर्म्युला इंदुरीकर महाराजांनी एका कीर्तनात मांडला होता, ते म्हणाले होते की सम तारखेला पती-पत्नी मध्ये संबंध आल्यास मुलगा होतो आणि विषम तारखेला संबंध आल्यास मुलगी होते. गेली पंधरा दिवस रोज त्यांच्या दाव्यावरून नवनवीन वाद पुढे येत आहेत. या वादाच्या केंद्रस्थानी राजकीय आणि सामाजिक संघटना आल्याने तो चिघळत गेला आहे, ज्यामुळे वारकरी संप्रदाय बदनाम होत असल्याचे मानव म्हणाले.

कोणताही वैज्ञानिक आधार इंदुरीकर महाराजांच्या सम-विषमच्या फॉर्म्युल्याला नाही, त्याचबरोबर हा मुद्दा सावरकरांनी सुद्धा खोडून काढलेला होता. या संपूर्ण प्रकारावर इंदुरीकर महाराजांनी माफी मागितल्यानंतर वाद थांबायला हवा, असे देखील श्याम मानव म्हणाले. या विषयी इंदुरीकर महाराजांनी केलेले वक्तव्य एका अर्थाने कायद्याच्या अनुषंगाने गुन्हा देखील ठरत असल्याने या पुढे त्यांनी केवळ समाज प्रबोधन करण्यावर भर द्यावा, अशी इच्छा श्याम मानव यांनी व्यक्त केली आहे.

Leave a Comment