ग्लूटेनची अॅलर्जी कशी ओळखाल ?


आजकालच्या आहारपद्धती मध्ये ‘ग्लूटेन फ्री’ डायट लोकप्रिय होत आहे. वजन कमी करण्यासाठी ग्लुटेन फ्री पदार्थांचे सेवन करण्याच्या प्रमाणात वाढ होत आहे. पण काही व्यक्ती अश्या आहेत, ज्यांना मुळातच ग्लूटेनची अॅलर्जी असते. पण ही अॅलर्जी नेमकी कशामुळे होत आहे हे लक्षात न आल्यामुळे आहारातील पथ्ये पाळणे अवघड होत असते. जर एखाद्याला ग्लूटेनची अॅलर्जी होत असेल, तर काही लक्षणांवरून ही अॅलर्जी समजून येऊ शकते. ग्लूटेन युक्त पदार्थ खाल्ल्याने उलट्या होणे, पोटदुखी उद्भविणे, डायरिया या सारख्या तक्रारी उद्भवू लागतात. या तक्रारींकडे वेळीच लक्ष पुरवून डॉक्टरांकडून निदान करवून घ्यावे. ग्लुटेनची अॅलर्जी असल्यास ही लक्षणे दिसून येतात-

जर ग्लूटेन युक्त पदार्थ खाल्ल्याने पोटदुखी उद्भवत असेल, तर ही ग्लूटेनची अॅलर्जी असू शकते. पोटदुखीच्या जोडीने गॅसेस, पोट फुगणे, बद्धकोष्ठ आणि डायरिया ह्या तक्रारी देखील उद्भवू शकतात. या अॅलर्जी मुळे लहान आतड्याच्या अस्तराला हानी पोहोचू शकते. ग्लूटेनच्या अॅलर्जी मुळे आहारातील क्षार, जीवनसत्वे शरीरामध्ये शोषली जाऊ शकत नाहीत. तसेच ग्लूटेनयुक्त पदार्थांचे सेवन केल्याने अचानक चक्कर येणे, तोल सांभाळता न येणे अशी लक्षणे दिसू लागली तर ही ग्लुटेनची अॅलर्जी असू शकते.

ग्लुटेन युक्त पदार्थ खाल्यानंतर सुमारे तासाभराने डोकेदुखी किंवा मळमळ सुरु होणे ग्लुटेनची अॅलर्जी असल्याचे लक्षण असू शकते. तसेच अचानक उद्भविणारे ‘ मूड स्विंग ‘ , म्हणजेच मनस्थिती सतत बदलत राहणे, हे देखील ग्लुटेनच्या अॅलर्जीचे लक्षण आहे. एखादा ग्लुटेन युक्त पदार्थ खाल्ल्यानंतर अंग खाजणे, किंवा अंगावर बारीक पुरळ उठणे हे ही अॅलर्जीचे लक्षण आहे.

ग्लुटेन युक्त पदार्थ खाल्ल्याने ही लक्षणे उद्भविताना आढळली, तर त्वरित डॉक्टरांचा सल्ला घेऊन योग्य निदान करून घ्यावे. तसेच आपल्या आहारामध्ये ग्लुटेन फ्री अन्नपदार्थांचा समावेश करावा.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment