ओव्याचे आरोग्यासाठी फायदे


सर्वसाधारणपणे ओव्याचा वापर स्वयंपाकामध्ये एखाद्या पदार्थाचा स्वाद वाढविण्यासाठी केला जातो. घरामध्ये कोणाला अचानक पोटदुखीचा त्रास सुरु झाला, तर थोडासा ओवा गरम करून खावयास देणे, हे तर आजीच्या बटव्यातले पोटदुखीवरचे रामबाण औषध आहे. पण केवळ पोटदुखीवरच नाही, तर सर्दी-पडसे, शरीरामध्ये भरून राहिलेली थंडी, किंवा सतत नाकातून पाणी गळत असल्यासही ओवा घेतल्याने फायदा होतो. ओव्यामध्ये शरीरातील हानिकारक तत्वे बाहेर टाकण्यास मदत करणारी, तसेच पोटातील जळजळ रोखणारी तत्वे असतात. तसेच छातीमध्ये जमलेला कफ निघून येण्यासाठी देखील ओव्याचा उपयोग होतो. सायनसचा त्रास असणाऱ्या व्यक्तींकरिताही ओवा गुणकारी आहे.

पोटाशी संबंधित अनेक विकारांमध्ये ओवा गुणकारी आहे. ओव्याचे सेवन केल्याने पोटदुखी, गॅसेस, उलट्या होणे, आम्लपित्त, या विकारांमध्ये आराम मिळतो. पोटाशी संबंधित विकारांवर ओव्याचे सेवन करण्याकरिता ओवा, काळे मीठ, आणि सुंठ एकत्र करून त्याची पावडर करावी. हे चूर्ण घेतल्याने पित्त आणि उलट्यांच्या त्रासामध्ये लगेच गुण दिसून येतो. तसेह अपचन झाले असेल, तर ओवा थोडा तव्यावर शेकून घेऊन चावून खावा. त्याने अपचन दूर होण्यास मदत होईल.

वजन घटविण्यासाठी देखील ओवा उपयुक्त आहे. ओवा घालून ठेवलेले पाणी प्याल्याने शरीराची चयापचय शक्ती वाढण्यास मदत होते. त्यामुळे शरीरातील चरबी घटू लागते. हा उपाय करण्यासाठी एक ग्लास पाण्यामध्ये एक चमचा ओवा रात्रभर भिजवून ठेवावा. सकाळी या पाण्यामध्ये एक चमचा मध घालून हे पाणी रिकाम्या पोटी प्यावे. जर आवडत असेल, तर हे पाणी आधी ओव्यासकट उकळून घेऊन मग गाळून घ्यावे आणि थोडे थंड झाल्यावर त्यामध्ये मध घालून प्यावे. जर खूप दिवस सतत खोकला येत असेल, तर ओव्याचे पाणी त्यावर अतिशय गुणकारी आहे. यासाठी पाण्यामध्ये ओवा घालून हे पाणी उकळून घ्यावे. थोडे थंड झाल्यावर पाणी गाळावे, व त्यामध्ये थोडेसे काळे मीठ घालून ह्या पाण्याचे सेवन करावे.

जर सतत गुडघे दुखत असतील, तर ओवा गरम करावा, व एका रुमालात बांधून घेऊन, त्या पुरचुंडीने गुडघ्यांना शेक घ्यावा. अर्धा कप ओव्याच्या पाण्यामध्ये सुंठीची पूड घालून या पाण्याचे सेवन केल्याने ही सांधेदुखीमध्ये आराम पडतो. कधी कुठल्या इन्फेक्शन मुळे हिरड्यांना सूज येते, अश्यावेळी ओव्याच्या तेलाचे काही थेंब कोमट पाण्यामध्ये घालून, या पाण्याने गुळण्या केल्यास हिरड्यांची सूज कमी होण्यास मदत होते. याशिवाय ओवा भाजून घेऊन त्याची पूड करावी, व ही पूड वापरून हिरड्यांवर हलक्या हाताने मालिश करावी. या उपायाने देखील हिरड्यांची सूज कमी होण्यास मदत होते.

काही महिलांना मासिक पाळीच्या वेळी कंबरदुखी आणि पोटदुखीचा अतिशय त्रास होतो. अश्या वेळी थोडासा ओवा, गरम पाण्याबरोबर घेतल्याने कंबरदुखी आणि पोटदुखी कमी होते. पण ओवा उष्ण असल्याने ज्या महिलांना मासिक पाळी मध्ये रक्तस्राव जास्त होतो, त्यांनी ह्या उपयाचा अवलंब करताना काळजी घावी. ज्या व्यक्तींच्या चेहऱ्यावर सतत मुरुमे पुटकुळ्या येत असतील, त्यांनी ओव्याची पूड करून घेऊन, ही पूड दह्यामध्ये मिसळावी, व चेहऱ्यावर लावावी. जेव्हा हा लेप सुकेल, तेव्हा कोमट पाण्याने चेहरा स्वच्छ धुवून टाकावा. काही दिवसातच चेहऱ्यावर मुरूमे येणे बंद होईल.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment